सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची नोंद झाली आहे. व्याघ्र प्रकल्पातील जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष चाळके यांना हे गिधाड घिरट्या मारताना दिसलं. त्यांनी तात्काळ आपल्या कॅमेऱ्यात या गिधाडाला कैद केलं आहे.
ADVERTISEMENT
हा पक्षी तिबेट, कझाकिस्तान, उझबेगिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान याचसोबत पाकिस्तान ते नेपाळ, भूतान, पश्चिम चीन, मंगोलिया, युरोप, उत्तर आफ्रिका या भागांत आढळतो. हजारो किलोमिटरचा प्रवास करुन हे गिधाड महाराष्ट्रात आलंय. आकाशात उंच घिरट्या मारत हे गिधाड आपलं भक्ष्य शोधत असतं.
संतोष चाळके यांनी या गिधाडाचा फोटो काढत पक्षी तज्ज्ञ रोहन भाटे यांना दिला आहे. या पक्षाचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वलचर असं आहे. या गिधाडाच्या उजव्या पंखावर नारंगी रंगाचे टॅग लावण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे कोणत्यातरी अभ्यासकाने स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी हे केलं असावं असा अंदाज बांधण्यात येतोय. याबद्दलची माहिती गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संधोधक आणि अभ्यासकांना देण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT