रत्नागिरी: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु आता ते अधिक चिघळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तरी एसटी सेवा सुरळीत सुरू आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान हे आंदोलन सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वातावरणही बिघडलं आहे. याचाच प्रत्यय सोमवारी दापोली एसटी आगारात आला. दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे चक्क हातात बांगड्या भरुन ड्युटीवर हजर झाले. त्यामुळे आगारात देखील याच विषयाची चर्चा सुरु होती. दुपारी 3 वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती.
याबाबत चालक अशोक वनवे यांनी सांगितले की, ‘सकाळी पत्नी माझ्याशी भांडत होती, की लोकं मरत आहेत आणि तुम्ही ड्युटीवर जाताय, पत्नीने कामावर जाऊ नका आणि जर गेलात तर हातात बांगड्या भरून जा. असे सांगितले. एकीकडे कामावर न आल्यास मेमो मिळेल ही भीती होती तर दुसरीकडे बायकोने हे असं सांगितलं, त्यामुळे मेमोही निघू नये आणि बायकोने भांडूही नये यासाठी बांगड्या भरून मी ड्युटीवर आलो आहे.’ असं अशोक वनवे यांनी सांगितलं.
चालक अशोक वनवे हे मूळचे बीड येथील असून ते नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. आपल्या व्यथा मांडताना त्यांनी सांगितलं की, ‘आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही. अवघ्या 13 हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे? हा प्रश्न आमच्यासमोर आहे.’
‘एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.’ असे वनवे म्हणाले.
‘आमच्या मागण्याना आता आश्वासने नकोत तर आमचे दुःख समजुन घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा.’ अशी प्रतिक्रिया त्यानी व्यक्त केली आहे.
ST Workers Strike : कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा लोकांना वेठीस धरू नये-अनिल परब
यावेळी प्रवाशांनीही एसटी कर्मचाऱ्यांची ड्युटी ही जोखमीची व त्रासदायक असते व ती ते चोखपणे पार पाडतात. त्यामुळे एसटी कर्मचारी यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवशाही बस प्रवाशांसह घेऊन अशोक वनवे ठाण्याकडे मार्गस्थ झाले. हा विषय जरी चर्चेचा ठरला असला तरी त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा निघावा अशीच अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT