आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातला वाद शिगेला गेल्यानंतर आणि बच्चू कडूंनी इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. गेल्या दोन दिवसात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या असून, रवी राणांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं होतं. आज राणा शिंदे आणि फडणवीसांची भेट घेणार आहेत.
ADVERTISEMENT
बडनेराचे आमदार रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सकाळीच नागपूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. मुंबई रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही रवी राणा भेट घेणार असल्याची माहिती आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलविल्यामुळे मी आज मुंबई जात आहे”, रवी राणांनी नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी सांगितलं. शिंदे-फडणवीसांनी यात मध्यस्थी केल्यानं बच्चू कडू-रवी राणा वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडू-रवी राणा वाद : एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, प्रविण दरेकरांचे फोन… काय घडलं?
बच्चू कडूंनी २८ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत रवी राणांना पुरावे देण्याचं आव्हान दिलं. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा दिला.
बच्चू कडू आक्रमक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात हालचाली झाल्या. बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे पत्रकार परिषदेनंतर (२८ ऑक्टोबर) त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, प्रविण दरेकर आणि उदय सामंत यांनी फोन केला. “हे प्रकरण वाढवू नका. त्याला (रवी राणा) शांततेत घ्या. मुख्यमंत्री म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबत बोलतो”, असं या नेत्यांनी सांगितल्याचं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणेच आता घडामोडी होताना दिसत आहे. बच्चू कडू यांच्याशी फोनवरून बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना मुंबईला भेटीसाठी बोलावून घेतलं. त्याचबरोबर बच्चू कडूंच्या बाजूनं शिंदे गटाकडून सुरूवातीला कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, बच्चू कडू आक्रमक झाल्यानंतर शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनीही रवी राणांना सुनावलं आणि फडणवीसांनाही यात मध्यस्थी करण्याची मागणी केलीये.
रवी राणा-एकनाथ शिंदेंच्या भेटी काय होणार?
रवी राणांनी बच्चू कडूंवर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केलेला आहे. त्यावर बच्चू कडूंनी आक्षेप घेतला आहे. दोघांचा वाद चिघळल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यात हस्तक्षेप केला असून, रवी राणा-शिंदे यांची आज भेट होणार आहे. त्यामुळे आजच्या भेटीत शिंदे काय राणांना काय सांगणार, याकडे बच्चू कडूंसह शिंदे गटाचंही लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT