– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी
ADVERTISEMENT
सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार आणि कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा दर निश्चीत करुन धोरण आखावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्या अन्नत्याग आंदोलनात तुपकर यांनी पाम तेलावरचा आयात कर पूर्वीप्रमाणे 30 टक्के करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात यावा या मागण्याही केल्या आहेत.
बुधवारपासून तुपकर यांनी नागपुरात या आंदोलनाला सुरुवात केली. परंतु नागपूर पोलिसांनी तुपकरांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुपकरांना रात्री साडे दहा वाजता ताब्यात घेऊन त्यांच्या बुलडाण्याच्या निवासस्थानी सोडले.
परंतू आंदोलनाच्या मागणीवर ठाम असलेल्या रविकांत तुपकरांनीही माघार घ्यायची नाही असा निश्चय केला आहे. जिथे पोलीस सोडतील तिथेच अन्नत्याग सत्याग्रह करू, त्यानुसार आता तुपकरांनी आपल्याच घरासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे.
रविकांत तुपकरांनी घरासमोर सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनावर नागपूर व बुलडाणा पोलिसांचा पहारा आहे. पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी तुपकरांची भूमिका व्यक्त केली आहे.
नागपूरवरुन बुलढाण्याला जात असताना वाटेत अकोल्यामध्ये तुपकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना तुपकर यांनी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. अनेक राजकीय पक्षांचे कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र शेतकर्यांच्याच आंदोलनामुळे कोरोना वाढतो का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.येत्या दोन दिवसात विदर्भात संघटनेच्यावतीने विविध आंदोलन करून 20 नोव्हेंबरला गाव बंद करणार असल्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.
ADVERTISEMENT