Omicron चा वाढता धोका.. यूपीमध्ये नाइट कर्फ्यू लागू, महाराष्ट्रातही पुन्हा लॉकडाऊन होणार?

मुंबई तक

• 07:48 AM • 24 Dec 2021

लखनऊ: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी 25 डिसेंबरपासून राज्यात ‘नाइट कर्फ्यू’ जाहीर केला आहे. तसेच लग्न-मिरवणूक कार्यक्रमांमध्ये कोव्हिड प्रोटोकॉलसह 200 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय टीम-09 ला मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. […]

Mumbaitak
follow google news

लखनऊ: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी 25 डिसेंबरपासून राज्यात ‘नाइट कर्फ्यू’ जाहीर केला आहे. तसेच लग्न-मिरवणूक कार्यक्रमांमध्ये कोव्हिड प्रोटोकॉलसह 200 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय टीम-09 ला मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.

हे वाचलं का?

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत 25 डिसेंबरपासून उत्तरप्रदेशमध्ये नाइट कर्फ्यू लागू होणार आहे. दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल.

याशिवाय बाजारपेठांमध्ये ‘मास्क नाही, तर सामानही नाही’असा संदेश देत व्यापाऱ्यांना जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावर, बाजारात प्रत्येकासाठी मास्क अनिवार्य आहे. देशाच्या कोणत्याही राज्यातून किंवा परदेशातून यूपीच्या सीमेवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ट्रेसिंग-चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच बस, रेल्वे आणि विमानतळावर अतिरिक्त दक्षता घेण्यात येणार आहे.

गेल्या 24 तासांत उत्तरप्रदेशमध्ये 1 लाख 91 हजार 428 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यात 49 नवीन बाधितांची पुष्टी झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय कोव्हिड रुग्णांची संख्या 266 आहे, तर 16 लाख 87 हजार 657 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी 37 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लागणार?

दुसरीकडे महाराष्ट्रात एकाच दिवसात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले तब्बल 23 रुग्ण आढळून आल्यानं आता निर्बंध आणखी कडक केले जाण्याची दाट शक्यता आहे. आगामी ख्रिसमस, नववर्ष, विवाह सोहळे, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक पावलं उचलली जाणार दाट शक्यता असून, यासंदर्भातील नियमावली आज (24 डिसेंबर) जाहीर केली जाणार आहे.

केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून कडक पावलं उचलण्याची सूचना केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठक घेतली. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील, यावर टास्क फोर्सच्या बैठक चर्चा करण्यात आली.

आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गर्दी रोखण्यासाठी गृह विभागाकडून न्यू इयर पाटर्य़ांवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली.

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नववर्षांच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पाटर्यांवरील निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. या काळात रात्रीची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली जाण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे अशीही शक्यता वर्तवली जात आहे की, जर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Omicron पाठ सोडत नाही… त्यातच आता नवा व्हेरिएंट DELMICRON ही आला?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

ओमिक्रॉन व्हेरिएंट हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे लक्षण असल्याचं तज्ज्ञ मानत आहेत. आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनीही नवीन अभ्यासाचा हवाला दिला आणि सांगितले की, कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा परिणाम डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिसून येण्यास सुरुवात होईल. दरम्यान, जानेवारी अखेरच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्य शिखर गाठेल. असे त्यांनी सांगितले होते.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गर्दीत जाऊ नका, मास्क घाला आणि लस घ्या, असा सल्ला दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय रुग्ण पॉझिटिव्हिटी, दुप्पट दर आणि नवीन रुग्णांचे क्लस्टर निरीक्षण करणं आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आधी स्थानिक पातळीवर निर्बंध लादण्याचा विचार करावा. असाही सल्ला देण्यात आला आहे.

    follow whatsapp