उल्हासनगर शहरात ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर चोरट्यांनी एका घरात हात साफ केला आहे. उल्हासनगरच्या झुलेला मंदिर परिसरातील गोपाळ वाधवा यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत २२ लाखांचं सोन-चांदी असा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
उल्हासनगरच्या कँप नंबर २ भागात झुलेलाल मंदिराजवळ गोपाळ वाधवा यांचं घर आहे. मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी घरामागील खिडकीच्या दोन लोखंडी सळई कापून आत प्रवेश केला. महत्वाची गोष्ट म्हणजे आपला पुरावा सापडू नये म्हणून चोरट्यांनी हातात ग्लोव्ह्ज घातले होते. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील सदस्य ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीला बाहेरुन कडी लावली.
यानंतर चोरट्यांनी घरातील २२ लाख किमतीचं सोन-चांदी लुटून नेली. ज्यात १६ अंगठ्या, १४ बांगड्या, व्हाईट सोन्याची बांगडी, सोन्याची चैन, मंगळसूत्र, हिऱ्याची नथ, सोन्याच्या रिंग, कानातले, सोन्याचे शिक्के, चांदीचे ग्लास असा मुद्देमाल लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशीला सुरुवात केली आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT