RSS आणि मोहन भागवत यांच्या सोशल मीडिया DP वर तिरंगा, विरोधकांनी केली होती टीका

मुंबई तक

• 03:34 AM • 13 Aug 2022

देशभरात सध्या स्वातंत्र्याचं ७५ वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने हर घर तिरंगा ही मोहीमही राबवली जाते आहे. मोदी सरकारने केलेल्या आवाहनानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांचा डीपीही तिरंगा ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या हजारो लोकांनी तिरंगा डीपी ठेवला आहे. मात्र RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन […]

Mumbaitak
follow google news

देशभरात सध्या स्वातंत्र्याचं ७५ वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने हर घर तिरंगा ही मोहीमही राबवली जाते आहे. मोदी सरकारने केलेल्या आवाहनानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांचा डीपीही तिरंगा ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या हजारो लोकांनी तिरंगा डीपी ठेवला आहे. मात्र RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा डीपी बदलला नव्हता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र १३ तारखेला हा डीपी बदलण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मोहन भागवत आणि RSS यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी तिरंगा

मोहन भागवत आणि RSS यांनी त्यांचा डीपी आता तिरंगा ठेवला आहे. RSS च्या ट्विटर पेजचा डीपीही तिरंगा ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करूनही संघाने आणि मोहन भागवत यांनी डीपी बदलला नाही अशी टीका काँग्रेसने केली होती. संघाला तिरंगा पसंत नाही त्यामुळेच ते असं करत आहेत अशीही टीका काँग्रेसने केली होती.

राहुल गांधी यांनीही केलं होतं संघाविषयीचं ट्विट

राहुल गांधी यांनी संघाबाबत ट्विट करत म्हटलं होतं की जे आत्ता हर घर तिरंगा ही मोहीम चालवत आहेत ते अशा संस्थेचा भाग आहेत ज्यांनी ५२ वर्षे तिरंगा फडकवला नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस उतरली होती त्यावेळीही आम्हाला रोखू शकले नव्हते आताही रोखू शकणार नाहीत या आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

काँग्रेसचे नेते पवन खेरा आणि खासदार जयराम रमेश यांनीही मोहन भागवत आणि RSS वर टीका केली होती. ज्या संस्थेने ५२ वर्षे तिरंगा फडकवला नाही ते डीपी कसा बदलतील? या आशयाचं ट्विट या दोघांनीही केलं होतं. यानंतर आता मोहन भागवत आणि संघ यांनी त्यांचा डीपी बदलला आहे.

काय म्हटलं होतं मोहन भागवत यांनी तिरंगा झेंडा आणि संघाच्या नात्याविषयी?

कायम हा प्रश्न उपस्थित केला जातो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा फडकवतो तिरंगा नाही. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिरंगा झेंडा जन्माला आला तेव्हापासून संघ त्याच्यासोबत ठामपणे उभा आहे. मी तुम्हाला सत्यकथा सांगतो आहे. जेव्हा तिरंगा झेंडा आपला ध्वज असेल हे निश्चित झालं तेव्हा फैजपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशात तिरंगा फडकवला गेला. त्यावेळी ध्वजस्तंभ ८० फूट उंच होता असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

पंडित नेहरू हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांच्या हस्ते हा तिरंगा फडकवला जाणार होता. पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवण्यासाठी दोरी ओढली तेव्हा तो ध्वज पूर्ण म्हणजे ८० फूट वर गेला नाही मधे लटकू लागला. एवढं उंच जाऊन दोरीचा गुंता सोडवण्याचं साहस कुणामध्येच नव्हतं. तेवढ्यात गर्दीतून एक तरूण आला. तो सरसर खांबावर चढला, त्याने गुंता सोडवला त्यामुळे ध्वज ८० फूट वर जाऊन फडकला. आता ही घटना घडल्यानंतर स्वाभाविकपणे त्या तरूणाला तिथल्या लोकांनी खांद्यावर उचललं. त्याला पंडित नेहरूंकडे घेऊन गेले.

पंडित नेहरू यांनी त्याचं कौतुक केलं, त्या तरूणाची पाठ थोपटली. त्या तरूणाला पंडित नेहरूंनी अधिवेशनात बोलावलं तुझं अभिनंदन करू, सत्कार करू. त्यावेळी पंडित नेहरूंना काही लोकांनी सांगितलं की त्याला बोलवू नका तो शाखेत जातो. जळगावातल्या फैजपूरमध्ये राहणारे किसनसिंग राजपूत नावाचे ते स्वयंसेवक होते. पाच-सहा वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. डॉ. हेडगेवार यांना जेव्हा ही बाब कळली तेव्हा ते स्वतः जळगावला गेले त्यांनी राजपूत यांना चांदीची छोटीशी लोटी भेट म्हणून दिली.

पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हापासून स्वयंसेवक तिरंग्याशी जोडला गेला आहे. त्यावेळी तर तिरंग्यावर चरखा होता अशोकचक्रही नव्हतं. पहिल्यांदा म्हणजेच १९३१ मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर केला तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी संघाला संचलन काढण्याचे आदेश दिले होते. ही आठवणही मोहन भागवत यांनी सांगितली होती

    follow whatsapp