रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संघर्ष थांबण्याच्या आशादायक घडामोडी सुरू झाल्या असल्या, तरी दोन्ही लष्करी झटापट मात्र सुरूच आहे. आज रशियन फौजांनी राजधानी कीवच्या सीमेवर धडक दिली. त्यानंतर रशियाने शस्त्र खाली टाकल्यास चर्चेस तयार असल्याचा प्रस्ताव युक्रेन सरकारला दिला. या प्रस्तावाला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अनुकूल प्रतिसाद दिला असून, चर्चेचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, कीव आणि परिसरात अजूनही हवाई हल्ले सुरूच आहेत.
ADVERTISEMENT
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बंडखोरांच्या ताब्यातील युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र देशाचा दर्जा दिल्यानंतर लष्करी हालचाली वाढल्या होत्या. त्यानंतर रशियाच्या संसदेनं लष्कराचा देशाबाहेर वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनवर आक्रमण केलं.
एकीकडे लष्करी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे रशिया आणि युक्रेनने चर्चेसाठी आपापली कवाडे खुली केली आहेत. रशियन गुप्तहेरांसह लष्कर राजधानी कीवच्या सीमेवर धडकल्यानंतर रशियाने युक्रेनकडे चर्चेसाठीचा प्रस्ताव पाठवला. युक्रेन लष्कराने शस्त्र टाकत शरणागती पत्करली, तर चर्चेस तयार असल्याचं रशियाने म्हटलं होतं. त्यानंतर युक्रेनकडून चर्चेसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला.
आता दोन्ही देशांची शिष्टमंडळं समोरासमोर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मात्र, दोन्ही देशांची चर्चा तिसऱ्याच देशात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशातील चर्चा बेलारुसची राजधानी मिन्स्कमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही चर्चा कधी होणार याबद्दल कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही.
एकीकडे चर्चा करण्याच्या प्रस्तावांची देवाणघेवाण सुरू असताना रशियन लष्कराची मोहीम, मात्र थांबवलेली नाही. कीवमध्ये युद्ध सुरूच असून, दोन्ही बाजूंनी लष्करी संघर्ष सुरू आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ असलेल्या अॅण्टॉनॉव्ह विमानतळावर कब्जा मिळवला असल्याचा दावा रशियन लष्कराकडून करण्यात आला आहे. तर रशियाचे 1000 सैनिक मारले असल्याचा दावा युक्रेननं केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
विशेष लष्करी अभियान असं संबोधत रशियानं युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर हळूहळू रशियन लष्कर पुढे पुढे सरकार युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेनं जात होतं. यावेळी रशियाच्या लष्कराला युक्रेनच्या लष्कराकडून प्रत्युत्तर दिलं गेलं. आक्रमक झालेल्या रशियन लष्कराने युक्रेनमधील अनेक ठिकाणी मिसाईल आणि बॉम्ब डागले. या दोन्ही बाजूने सुरू असलेल्या संघर्षात युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे.
युक्रेनच्या लष्कराने शरणागती पत्करली, तर चर्चेस तयार असल्याचं रशियाने म्हटलं आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष निवळण्याची किंचितशी संधी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
रशियाने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. जगभरातील राष्ट्रांनी रशियाकडे शांततेच्या मार्गाने आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, सध्या दोन्ही देशात संघर्ष पेटला आहे.
युक्रेनशी चर्चा करण्यास पुतिन तयार -चीन
दरम्यान, रशिया-युक्रेन यांच्या संघर्ष पेटलेला असताना शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं आहे.
नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी धावा
रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनमध्ये 137 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 316 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. तर प्रत्युत्तरादाखल युक्रेन लष्कराने केलेल्या हल्ल्ल्यात रशियाचे 400 पेक्षा अधिक जवान मारले गेले असल्याचा दावा ब्रिटनकडून करण्यात आला आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक नागरी वसाहतींवर हल्ले करण्यात आले आहेत. अनेक इमारतींवर मिसाईल डागण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गोळीबार आणि हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मालमत्तांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT