शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शनिवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. याप्रकरणी दादर पोलिसात ठाकरे गटाच्या 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या घटनेदरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका खासदार अरविंद सावंत यांनी घेतली.
ADVERTISEMENT
सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा
सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. गोळीबार करून आमच्याच लोकांवर गुन्हा दाखल केला. पोलीस देखील त्यांचंच ऐकत आहे. आमच्या लोकांनी त्यांच्या अगोदर तक्रार करून सुद्धा पोलिसांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. तपास न करता थेट 395 सारखा दरोड्याचा कलम लावला. त्यामुळे 395 सारखा कलम त्यातून काढण्यात यावं आणि सदा सरवणकर यांच्यावर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका अरविंद सावंत यांनी घेतली.
गोळीबार झालाच नाही : शिंदे गट
सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. या गोळीबारातून महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले, असाही दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. मात्र, अशाप्रकारचा गोळीबार झालाच नाही, असं शिंदे गटाने स्पष्ट केलंय. त्यामुळे सदा सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारप्रकरणी जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही, तोवर पोलीस ठाण्यात हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा अरविंद सावंत यांनी घेतला आहे.
अरविंद सावंत यांनी पोलीस अधिकाऱ्याना सुनावलं
यावेळी खासदार अरविंद सावंत हे दादर पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना त्यांच्या वाहनांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. यावरून अरविंद सावंत चांगलेच चिडले. वाहनांना पोलीस स्टेशन परिसरात परवानगी न दिल्याने तुमची पण दादागिरी सहन करायची का? असं म्हणत त्यांनी उपस्थित पोलिसांना सुनावलं.
25 जणांवर गुन्हा दाखल
शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गटामध्ये मध्यरात्री प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेमधील कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दादर पोलिसांनी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघे अशा ५ जणांना अटक केली आहे.
स्टॉल लावण्यावरून राडा
संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांनीही स्टॉल लावला होता. त्यावेळी दोघांमध्ये वादची ठिणगी पडली होती. त्यावेळी हा मिटवण्यात आला होता. मात्र, महेश सावंत यांनी राग मनात ठेवून रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला.
ADVERTISEMENT