दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. साई पल्लवी तिच्या विराट पर्वम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे साई पल्लवीने?
”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं साई पल्लवीने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?
जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता असंही साई पल्लवीने म्हटलं आहे.
ट्विटरवर साई पल्लवीचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी साई पल्लवीला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काहींनी काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग यांची तुलना कशी काय होऊ शकते हा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी तिच्या भूमिकेचं समर्थनही केलं आहे. साई पल्लवीचा विराट पर्वम हा सिनेमा १७ जून रोजी प्रदर्शित होतो आहे. यात तिच्यासोबत राणा डग्गुबत्तीही मुख्य भूमिकेत आहे.
ADVERTISEMENT