Sakinaka Rape Case: Mumbai Police आयुक्तांकडून गस्तीदरम्यान नवीन नियमावली जाहीर

मुस्तफा शेख

• 03:39 PM • 13 Sep 2021

साकीनाका येथील बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीसांवर चहूबाजूंनी टीका होत आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या घटनेनंतर सर्व पोलीस स्टेशनना गस्तीदरम्यान नवीन नियम आणि सूचनांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन नियमानुसार आता मुंबईतील प्रत्येक […]

Mumbaitak
follow google news

साकीनाका येथील बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीसांवर चहूबाजूंनी टीका होत आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या घटनेनंतर सर्व पोलीस स्टेशनना गस्तीदरम्यान नवीन नियम आणि सूचनांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

नवीन नियमानुसार आता मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याला आपल्या हद्दीतील निर्जन ठिकाणं, सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या जागा आणि अश्लील कृत्यांमध्ये याआधी अटक झालेल्या आरोपींची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीसांनी अधिक दक्ष राहण्याचे आदेश आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

नवीन आदेशानुसार यापुढे जर पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना एखादी महिला रस्त्यावर एकटी आढळली तर महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्याशी संवाद साधून तिला कोणती मदत हवी आहे का याची विचारपूस करणं बंधनकारक करण्यात आलंय. गरज पडल्यास त्या महिलेला घरी सुखरुप पोहचवण्याची जबाबदारीही या पोलीस अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. याचसोबत शहरातील बेवारस कार, टेम्पो, ट्रक, पिक-अप व्हॅन यांच्या मालकांना तात्काळ शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वाहनांचे मालक जर सापडत नसतील तर ही वाहनं जप्त केली जाणार आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्याला यापुढे आपल्या हद्दीतीली अश्लील गुन्ह्यांमध्ये याआधी अटक झालेल्या आरोपींची एक यादी तयार करायला सांगण्यात आलेली आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशन, बस डेपो आहेत त्या पोलीस ठाण्याने रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत एक मोबाईल व्हॅन गस्तीसाठी ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या मोबाईल व्हॅनमधले अधिकारी जर एखाद्या महिला प्रवाशाला घरी पोहचण्यासाठी काही मदत हवी असेल तर ती उपलब्ध करुन देणार आहेत.

Sakinaka Rape Case: आरोपीविरुद्ध Atrocity चा गुन्हा दाखल, प्रमुख हत्यारही जप्त – आयुक्त हेमंत नगराळेंची माहिती

यासोबतच आपल्या हद्दीतील निर्जन स्थळी योग्य प्रकाश राहिल याची काळजी स्थानिक पालिका अधिकाऱ्यांच्या मार्फत पोलिसांना घ्यायची आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये महिलांविरुद्ध अत्याचारासंबंधी येणारा कॉलचं उत्तर गांभीर्याने दिलं जाणं गरजेचं आहे. निर्जन स्थळी पोलिसांचं पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या भागात महिलांची सार्वजनिक शौचालंय आहेत तिकडेही पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोलिंग दरम्यान कोणताही व्यक्ती संशयास्पदरित्या आढळला तर त्याची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    follow whatsapp