उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर दिल्लीतल्या मेदांता रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ‘नेताजी’ या नावाने ते प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे.
ADVERTISEMENT
मुलायम सिंह यादव हे जेव्हा रूग्णालयात दाखल झाले होते तेव्हापासूनच त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागली होती. रविवारी नेताजी मुलायम सिंह यादव यांची प्रकृती कशी आहे याची विचारपूस करण्यासाठी रघुराज प्रताप सिंह अर्था राजा भैय्याही मेदांता रूग्णालयात पोहचले होते. त्याआधी आपचे खासदार संजय सिंह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केली होती मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची चौकशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री ऱाजनाथ सिंह यांच्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अखिलेश यादव यांच्यासोबत संवाद साधून मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली होती. तसंच तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत असंही आश्वासन दिलं होतं.
मुलायम सिंह यादव यांचा अल्प परिचय
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ ला इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला होता. त्यांचे वडील सुघर सिंह यादव हे शेतकरी होते. मुलायम सिंह यादव हे सध्याच्या घडीला मैनपुरी मतदारसंघातून खासदार आहेत. उत्तर प्रदेशातलं राजकारण असो किंवा देशातलं राजकारण असो मुलायम सिंह यादव यांना देशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये स्थान मिळालं होतं.
मुलायम सिंह यादव हे आत्तापर्यंत तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. तसंच केंद्र सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्रीपदही सांभाळलं होतं. एवढंच नाही तर आमदारकीची निवडणूक मुलायम सिंह यादव यांनी ८ वेळा लढवली होती. तर ७ वेळा त्यांनी लोकसभा लढवली होती.
मुलायम सिंह यादव यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी मालती देवी यांचा मृत्यू २००३ मध्ये झाला. त्या अखिलेश यादव यांच्या आई होत्या. मुलाय सिंह यादव यांनी दुसरं लग्न साधना गुप्ता यांच्यासोबत केलं. साधना गुप्तांपासून मुलायम सिंह यादव यांना प्रतीक यादव हा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच साधना यादव यांचंही निधन झालं.
पाच दशकांची राजकीय कारकीर्द
-
१९६७, १९७४, १९७७, १९८५, १९८९, १९९३ आणि १९९६ अशा आठवेळा मुलायम सिंह यादव हे आमदार झाले
-
१९७७ मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते सहकार आणि पशूपालन मंत्री रहोते. लोकदल उत्तर प्रदेशचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे होतं.
-
१९८० मध्ये मुलायम सिंह यादव हे जनता दलाचे अध्यक्ष झाले
-
१९८२ ते १९८५ या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते
-
१९८५ ते ८७ या कालावधीत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं
-
१८८९ ते १९९१ या कालावधीत ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते
-
१९९२ मध्ये मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्ष स्थापन केला
-
१९९३ ते १९९५ या कालावधीत मुलायम सिंह यादव पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले
-
१९९६ मध्ये मुलायम सिंह यादव खासदार झाले
-
१९९६ ते १९९८ या कालावधी ते देशाचे संरक्षण मंत्री होते
-
१९९९ मध्ये ते पुन्हा एकदा खासदार झाले
-
१९९९ मध्ये तिसऱ्यांदा खासदार झाले आणि संसदेच्या सदनात सपाचे नेते झाले
-
ऑगस्ट २००३ ते २००७ या कालावधीत पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली
-
२००४ मध्ये ते पुन्हा एकदा लोकसभा खासदार झाले
-
२००७ ते २००९ या कालावधीत मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष नेते झाले
-
मे २००९ मध्ये मुलायम सिंह यादव हे आणखी एकदा खासदार झाले
-
२०१४ मध्ये ते सहाव्यांदा खासदार झाले
-
२०१९ मध्ये सातव्यांदा खासदार म्हणून मुलायम सिंह यादव जिंकले
ADVERTISEMENT