समीर वानखेडे दुबईच्या हॉटेलमध्ये होते, नवाब मलिकांनी दिले पुरावे…

मुंबई तक

• 03:12 PM • 21 Oct 2021

NCB चे झोनल डायरेक्टर यांनी हे मान्य केलं की ते मालदिवला गेले होते. मात्र त्यांनी हे मान्य केलं नाही की ते दुबईला गेले होते. मात्र आता मी त्याचे पुरावेच तुम्हाला देतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि जस्मिन वानखेडे यांचे दोन फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. समीर वानखेडे […]

Mumbaitak
follow google news

NCB चे झोनल डायरेक्टर यांनी हे मान्य केलं की ते मालदिवला गेले होते. मात्र त्यांनी हे मान्य केलं नाही की ते दुबईला गेले होते. मात्र आता मी त्याचे पुरावेच तुम्हाला देतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि जस्मिन वानखेडे यांचे दोन फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे हे दुबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये 10 डिसेंबर 2020 ला गेले होते. त्यामुळे समीर वानखेडे खोटं बोलत आहेत हे उघड झालं आहे असं नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे नवाब मलिक यांचं ट्विट?

नवाब मलिक यांनी दोन फोटो ट्विट केले आहेत. एकामध्ये जस्मिन वानखेडे दिसत आहेत दुसऱ्या फोटोत समीर वानखेडे दिसत आहेत. हे दोन्ही फोटो दुबईच्या ग्रँड हयात हॉटेलचे आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच मी दुबईला कधी गेलोच नाही असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. १० डिसेंबर २०२० ला समीर वानखेडे या हॉटेलमध्ये होते असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

काय आरोप केले होते नवाब मलिक यांनी?

‘सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना NCB मध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ते सातत्याने बॉलिवूडच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा अख्खं बॉलिवूड मालदिवमध्ये होतं तेव्हाच समीर वानखेडेही तिथे होते. त्यांचे कुटुंबीय होते. समीर वानखेडे तिथे खंडणी वसुलीसाठी गेले होते. समीर वानखेडे हे दुबईला का गेले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांनी आर्यन खान विरोधात उभी केलेली केस हा बनाव आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातं आहे’ असे आरोप नवाब मलिक यांनी केले होते.

या आरोपांना आता समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. मुंबई तकचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांनी समीर वानखेडे यांना फोन केला आणि नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारलं. तेव्हा नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि आपण या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची बहीण जास्मिन वानखेडे यांचेही काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. वसुलीसाठी जास्मिन वानखेडेही मालदिवमध्ये होत्या असेही आरोप त्यांनी केले. या आरोपांना जास्मिन वानखेडे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.

जस्मिन वानखेडे यांनी काय म्हटलं आहे?

नवाब मलिक यांनी माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाऊन स्टॉकिंग केलं. माझे पर्सनल फोटो हे त्यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले. हे त्यांना शोभत नाही. महिलांचा आदर ठेवायला शिका असं म्हणत जास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले आहेत. एका प्रामाणिक ऑफिसरवर तुम्ही संशय घेत आहात ही बाब योग्य नाही. समीर वानखेडे चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. एवढंच नाही तर नवाब मलिक हे मला लेडी डॉन म्हणतात. कुठल्या पुराव्यांनिशी त्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे? मी एक वकील आहे आणि माझ्यावर त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत. या आरोपांना काहीही अर्थ नाही असंही आज जास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp