मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्या लग्नाशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या काही दाव्यांनंतर आता एक काझी समोर आला आहे. ज्याने समीर वानखेडे आणि शबाना नावाच्या मुलीशी लग्न लावल्याचा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी जो निकाहनामा शेअर केला आहे तो खरा असल्याचं काझी मुझम्मील अहमद यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर ज्यावेळी हे लग्न झालं तेव्हा समीर आणि त्याचे कुटुंबीय हे मुसलमानच होते असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणातील गुंता हा फार वाढला आहे.
पाहा काझींनी नेमका काय दावा केलाय
‘समीर आणि शबाना आणि यांचे वडील त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सगळे मुसलमान होते. जर हे माहित असतं की, समीर हिंदू आहे तर हे लग्नच झालं नसतं आमच्या शरीयतमध्ये. काझी हा शरियतच्या विरोधात जाऊन निकाह वाचतच नाही. त्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. आज ते काहीही म्हणत असू दे. पण त्यावेळी समीर हा मुसलमान होता.’
‘नवाब मलिक यांनी जो फोटो ट्वीट केला आहे त्यात असलेले दोघे जण म्हणजे समीर आणि त्याची पत्नी हेच आहेत.’
‘लोखंडवालामध्ये हे लग्न झालं होतं आणि त्यावेळी अनेक मोठमोठी लोकं देखील लग्नासाठी आले होते. जवळजवळ 2000 लोकं त्यावेळी लग्नाला आले होते. मोठ्या आनंदात हा लग्नसोहळा पार पडला होता.’
‘हे संपूर्ण लग्न पूर्णपणे मुस्लिम पद्धतीने पार पडलेलं होतं. हे सर्व मुस्लिम लोकं होतं. त्यावेळचे साक्षीदार देखील मुस्लिम होते. वकील देखील मुस्लिम होते आणि आई-वडील देखील मुस्लिम होते.’
‘जर त्यावेळी हे समोर आलं असतं की, समीर हिंदू आहे किंवा त्याची पत्नी हिंदू आहे तर काझीने निकाहच वाचला नसता. कारण आमच्या शरीयतमध्ये तो निकाह होऊच शकत नाही. तर शरीयतच्या विरुद्ध काझी हे काम करुच शकत नाही. त्यावेळी ते लोकं मुस्लिम होते.’ असा दावा काझी मुझम्मील अहमद यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी शेअर केला ‘निकाहनामा’
याआधी नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी समीर वानखेडेचा निकाहनामा प्रसिद्ध केला होता. नवाब मलिक यांनी असं म्हटलं होतं की, ‘वर्ष 2006 मध्ये 7 डिसेंबर, गुरुवारी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्यात विवाह झाला होता. हा विवाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे पार पडला होता.’
आणखी एका ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘लग्नात 33 हजार रुपये मेहर म्हणून देण्यात आले होते. यात साक्षी क्रमांक 2 हा अझीझ खान होता. जो यास्मिन दाऊद वानखेडेचा नवरा असून ती समीर दाऊद वानखेडेची बहीण आहे.’
Sameer Wankhede: ‘कोऱ्या कागदावर माझ्याही सह्या घेतल्या’, वानखेडेंविरोधात आणखी एका पंचाचा खळबळजनक आरोप
दरम्यान, आपल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘मी जी काही कागदपत्रं समोर आणत आहे ती समीर वानखेडे यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची आहेत. समीर वानखेडे हे आधी मुस्लिम होते आणि नंतर ते त्यांनी आपला धर्म बदलला आणि त्याच जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली.’
‘यामुळे या सगळ्या प्रकारात मी धर्माविषयी काहीही भाष्य करत नाही. आपल्या देशात संविधानानुसार, कोणताही व्यक्ती कधीही कुठलाही धर्म स्वीकारु शकतो. पण कायद्यानुसार, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील व्यक्तीने जर एखादा धर्म स्वीकारला तर त्याला मागास वर्गातील जातीचे कोणतेही फायदे मिळत नाही.’
ADVERTISEMENT