राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. तसंच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. अखेर आज संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला.
ADVERTISEMENT
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय नमूद केलंय ते पुढील प्रमाणे-
माननीय उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. आपण माझ्या भावना समजून घ्याल अशी इच्छा आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्याभोवती दिवंगत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचं वादळ घोंगावत आहे. पूजा चव्हाण यांचा मृत्यू दुर्देवी आहे. त्यांच्या मृत्यूचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावं अशी माझी ठाम भूमिका आहे. पण या सर्व प्रकरणाचं राजकीय भांडवल करून राज्यातील विरोधी पक्ष माझ्यावर चारित्र्यावर चिखलफेक करत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. विधानसभा चालू न देण्याची त्यांची भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या सर्व प्रकरणी दिवंगत पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबियांची बदनामी विरोधक करत आहेत. महाराष्ट्रात असं खालच्या थराचं राजकारण कधीही झालेलं नाही. आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि राहीन. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर येईपर्यंत सरकारचा मंत्री म्हणून पदावर राहणं नैतिकतेला धरून आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.
आपला नम्र,
संजय राठोड
ADVERTISEMENT