महाराष्ट्रात सध्या हनुमान चालीसा, मशिदींवरचे भोंगे, त्याविरोधात महाआरती, माझं हिंदुत्व, तुझं हिंदुत्व हे सगळे विषय गाजत आहेत. अशात बाबरी मशिदीचा विषय निघाला नसता तरच आश्चर्य वाटलं असतं. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी जी सभा घेतली त्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. ४ मे पासून भोंगे खाली उतरले नाहीतर तर हनुमान चालीसा वाजणार म्हणजे वाजणारच असं त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की खरं तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही, पण मला असं म्हणून हिंदूंची संख्या कमी करायची नाही. मात्र हे नक्की म्हणतो तुम्ही (शिवसेना) म्हणजे हिंदुत्व नाही. एवढंच नाही तर बाबरी पडली तेव्हा मी तिथे होतो असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपला डिवचलं आहे.
काय आहे संजय राऊत यांचं ट्विट?
लालकृष्ण आडवाणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काय सांगितलं तो व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात लालकृष्ण आडवाणी मराठी माणूस तिथे आहेत असं सांगताना दिसत आहेत. तसंच बाबरी कुणी पाडली? ऐका असं म्हणत हा व्हीडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.
त्यानंतर सामनाच्या पेपरचे जुने पेजही ट्विटरवर शेअर केले आहेत. बमों से लैस शिवसेना कार्यकर्ता अयोध्या जायेंगे, शिवसेना के प्रदेश प्रमुख के घर पर छापा या आशयाच्या या बातम्या आहेत. ज्यातून शिवसेनेचा बाबरी पाडण्यात सहभाग होता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आता बोला असं कॅप्शनही दिलं आहे.
काय म्हणाले फडणवीस?
“यांना वाटतं हेच महाराष्ट्र आहेत, यांना वाटतं हेच मराठी आहेत. यांना वाटतं यांचंच हिंदुत्व आहे. काय म्हणाले परवा? बाबरी मशिद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते? कुणीतरी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली आहे, हे सांगतात आम्ही बाबरी पाडली. बाबरी ढाचा होता, पारतंत्र्यांचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम करणारे कारसेवक होते. आम्हाला याचा अभिमान आहे. ढाचा पाडला तेव्हा तुम्ही कुठे होतात? विचारताय ना मी अभिमानाने सांगतो होय मी ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. देवेंद्र फडणवीस ढाचा पाडण्यासाठी होता. कारसेवेवेमध्ये राम मंदिरासाठी बदायूच्या जेलमध्ये मी घालवले आहेत. लाठी-गोळी खाण्याचं काम आम्ही केलं आणि तुम्ही विचारता आम्ही कुठे? बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातला कुठला नेता गेला होता? शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता. बाबरी पडल्यावर कुणावर आरोप झाला? त्यात ३२ आरोपी होते. लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग, विनय कटियार, साध्वी ऋतंबरा, महंत गोपालदास, रामविलास वेदांती, जयभान सिंह पवय्या हे आणि असे आरोपी होते. ३२ आरोपींमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नाही.” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ADVERTISEMENT