भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ केला. तर ‘औरंगजेब क्रूर नव्हता’, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. यावरूनच खासदार संजय राऊतांनी आव्हाडांचा चिमटे काढलेत, तर बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या विधानावर आता भाजपने वाद केला; पण संभाजीराजे धर्मवीर म्हणून मान्य पावले ते औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या निर्घृण अत्याचारामुळे. त्या औरंगजेबाचा अत्यंत आदरपूर्वक ‘मा. औरंगजेबजी’ असा उल्लेख काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.”
“याच ‘औरंगजेबजी’ यांनी धर्मवीर संभाजीराजांना अटक केली, त्यांची धिंड काढली, त्यांना विदूषकी पोशाख घातला, त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचे डोळेही फोडले, पण संभाजीराजेंनी धर्माभिमान व स्वाभिमान सोडला नाही. हे सर्व ज्या क्रूरकर्मा औरंगजेबामुळे घडले ते ‘औरंगजेबजी’ काय साधी असामी होती? असेच भाजपच्या बावनकुळेंना म्हणायचे आहे”, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधलाय.
Raut: ‘शिंदे सरकार फेब्रुवारीही पाहणार नाही, राऊतांनी कारणच सांगितलं!
जितेंद्र आव्हाडांवर टीकेचे बाण, राऊतांनी रोखठोकमधून फटकारलं
“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाला नवे वळण देण्याचे काम याच दरम्यान केले. ‘औरंगजेब क्रूर नव्हता,’ अशी नवीच माहिती आव्हाडांनी समोर आणली. औरंगजेबाचे माहात्म्य सांगताना आव्हाड यांनी सांगितले, ‘विष्णूच्या मंदिरासमोर संभाजीराजांना अटक केली, पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही.’ या एका पुराव्याने औरंगजेबास क्रूर नसल्याचे व थोर मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र आव्हाड यांनी दिले व बहुधा त्याचमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना धारेवर धरताना औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला”, असं टीकास्त्र राऊतांनी आव्हाड आणि बावनकुळेंवर डागलं आहे.
राऊतांनी सांगितलं औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन
“पण मला तेच एकमेव कारण दिसत नाही. औरंगजेबास ‘माननीय’ किंवा ‘औरंगजेबजी’ ठरवण्यामागे भाजप नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे ‘पिताश्री’ गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला असावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच ‘औरंगजेबजी’ यांचा सन्मान करू शकतात. महाराष्ट्रात तेच घडले”, असं म्हणत राऊतांनी बावनकुळेंसह भाजपला लक्ष्य केलं आहे.
Election : काँग्रेस, NCPने डाव टाकला! पण ठाकरेंचे हात रिकामाचे राहणार?
‘पोलिटिकल कपल’, फडणवीस-शिंदेंना चिमटा
“राजभवनावर योगींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गेले. त्या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुहास्यवदनाने उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांशी महाराष्ट्रातील ‘पोलिटिकल कपल’ अत्यंत सलगीने वागताना टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवर जनतेने पाहिले. प्रेम आंधळे असते, पण यांना सत्तेने आंधळे केले व त्या अंधारात शिवरायांचा मान-सन्मान हरवला”, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे.
ADVERTISEMENT