मराठा आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही पण राज्यातलं ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल असा इशारा पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये दिला आहे. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नका असंही पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. लातूरमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी हा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आणू नका. ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काहीतरी सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलवू शकतो. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो एक दिवसही येईल. ओबीसी समाज शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
मराठा आणि ओबीसी समाजात वाद पेटवण्याचं पाप जर कुणी करत असेल तर आम्ही त्यालासुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही. ही आज माझी खंबीर भूमिका आहे. आमच्यामध्ये तुकडे पाडायची काही गरज नाही. एक वज्रमूठ आम्ही बनवू. ही बहुजनांची लढाई सामान्य माणसांसाठी असल्याचंही पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.
चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलीही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलीही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोप केला होता.
ADVERTISEMENT