12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचं परळी येथील मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे धमकी मिळाल्याने परळीत खळबळ उडाली. शुक्रवारी (26 नोव्हेंबर) वैद्यनाथ मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या नावे हे धमकीचं पत्र मिळालं असून, पोलीस प्रशासनाने मंदिर व परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
ADVERTISEMENT
मार्च 2020 पासून हे मंदिर कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असतानाच शुक्रवारी हे धमकीचं पत्र आलं.
वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे शुक्रवारी मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने (रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड) या पत्त्यावरुन हे पत्र आले असून, सदरील पत्र शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंदिर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
12 ज्योतिर्लिंगापैकी 5 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर समितीच्या विश्वस्तांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे. ‘आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे.’
‘हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन’, अशी धमकी तथाकथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली आहे. याप्रकरणी संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी मंदिराची सुरक्षाही वाढवली आहे.
ADVERTISEMENT