दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मुसळधार पावसामुळे मागील दोन दिवसांपासून पुराची (Flood) स्थिती उद्भवली आहे. अद्यापही कोल्हापूर हे पुरातून पूर्णपणे सावरु शकलेलं नाही. जाणून घेऊयात कोल्हापूरमध्ये पुराची नेमकी परिस्थिती आहे तरी कशी.
कोल्हापूरमध्ये पुराची स्थिती गंभीर झाल्यानंतर NDRF, आपत्ती व्यवस्थापन आणि लष्कराने (Indian Army) नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 76 हजार 26 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.
ज्यापैकी 67 हजार 111 जण हे आपल्या नातेवाईंकांकडे गेले आहेत तर 8 हजार 915 निवारा कक्षात आहेत. याशिवाय 42 कोव्हिड रूग्णांना देखील इतरत्र हलविण्यात आलं आहे. तसंच 25 हजार 573 पाळीव जनावरं देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 366 गावांना पुराचा फटका बसला असून यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे या पुरामुळे जिल्हयातील महावितरणची 10 उपकेंद्रे पूर्णत: बंद झाली आहेत. ज्याचा
1 लाख 12 हजार 961 ग्राहकांच्या वीजपुरवठयावर परिणाम झाला आहे.
कोणकोणते मार्ग आहेत बंद?
-
राष्ट्रीय महामार्ग (NH4) शिरोली पुलाजवळ पाण्यामुळे बंद
-
राज्य मार्ग- 25 पैकी 17 राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद तर 15 पूल पाण्याखाली
-
प्रमुख जिल्हा मार्ग- 112 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 55 मार्ग पाण्याखाली असल्याने बंद तर 32 पूल पाण्याखाली
बचाव कार्य:
जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकडया दाखल झाल्या असून बचाव कार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यावेळी भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.
प्रशासनाकडून आर्थिक मदतीचं आश्वासन
अतिवृष्टीने बाधित कुटूंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तर 24 हजार लाभार्थ्यांना 1 कोटी 21 लाख 21 हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.
Kolhapur Flood: कोल्हापूरकरांची भीषण अवस्था, पुणे-बंगळुरु हायवेवर 7 ते 8 फूट पाणी
पाहा कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-
राधानगरी धरण- 2600 मिमी- 1900 मिमी
तुळशी- 2844 मिमी- 1098 मिमी
कासारी- 2717 मिमी- 1797 मिमी
कुंभी- 4352 मिमी- 3597 मिमी
यावरुन आपल्याला लक्षात येईल की, गेल्या वर्षीच्या तुलनेने धरण क्षेत्रात यंदा दमदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे.
ADVERTISEMENT