मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवार (1 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन अत्यंत खळबळजनक आरोप केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात सगळा ड्रग्सचा खेळ सुरु आहे. असा अत्यंत गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. पाहा पत्रकार परिषदेत मलिकांनी नेमके काय आरोप केले.
ADVERTISEMENT
फडणवीसांवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप जसेच्या तसे:
‘महाराष्ट्रातील भाजपचे असे अनेक नेते आहेत की, ज्यांचा ड्रग्स व्यापाराशी घनिष्ठ संबंध आहे. आज काही सर्व नावांची चर्चा होणार नाही. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की, एक व्यक्ती आहे जयदीप राणा.. मी माझ्या ट्विटरवर त्याचा फोटो टाकला आहे.’
‘आम्हाला देशाला हेच सांगायचं आहे की, जयदीप राणा तुरुंगात बंद आहे. दिल्लीची जी केस आहे. माझ्या माहितीनुसार, एका सुनावणीत त्याला कोर्टात हजर करण्यात आलं नाही. ज्यामध्ये दिल्लीचे एनसीबीच्या झोनल युनिटने असं म्हटलं की, तो साबरमती तुरुंगात आहे.’
‘जयदीप राणा याला ड्रग ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात ही अटक झाली आहे. पण त्याचे संबंधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत.’
‘महाराष्ट्रात जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्नीने एक रिव्हर साँग केलं होतं. त्यामध्ये सोनू निगमने गाणं गायलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने देखील गाणं गायलं होतं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही अभिनय केला होता सोबतच मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते.’
‘हे सांगितलं जाऊ शकतं की, सार्वजनिक जीवनात कोणी कोणासोबत फोटो काढू शकतो हे आम्हाला माहित नाही. पण हा जो ड्रग पेडलर आहे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध खूप घनिष्ठ होते. आणखी एक फोटो टाकतो.. गणपती देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आहे की, देवेंद्र राणा यांच्या घरी आहे हे मला माहित नाही पण गणपती दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस, जयदीप राणा हे सोबत आहेत. याचा फोटो मी शेअर करतो आहे.’
‘हे प्रकरण एवढंच नाही. प्रकरण हे महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग व्यापाराचा आहे. मोठे-मोठे ड्रग पेडलर.. जसं की काशिफ खान याला सोडून दिलं जातं, रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा यांना सोडून दिलं जातं. या संपूर्ण ड्रग्सचा खेळ हा देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर या राज्यात सुरु आहे.’
‘ड्रगच्या संपूर्ण खेळाचे मास्टरमाईंड हे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल आमच्या मनात निर्माण झाला आहे. का भाजपचे लोकं सोडले जातात?’
‘आता हेच सांगितलं जाईल की, आम्हाला माहित नव्हतं. आपल्या नाकाखाली ड्रग्सचा धंदा सुरु होता. काही असे फोटो आम्ही यापुढे आपल्यासमोर आणणार आहोत की, जे ड्रग पेडलर आहेत जे भाजपमध्ये होते. त्या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू आपल्यासमोर आणणार आहोत.’
‘ज्याप्रकारे जयदीप राणाचा फोटो समोर आला हा काही योगायोग नाही की, तो त्यांच्या गाण्याचा फायनान्स हेड आहे. त्यानंतरही त्यांच्यातील घनिष्ठता ही त्यांच्या घरातील फोटोमधून दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे. हे स्पष्ट आहे.’
राज्यात ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
‘सीबीआयला जर चौकशीच करायची असेल तर ती त्यांनी ही करावी की, देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग्स प्रकरणाशी काय संबंध आहे. जयदीप राणा यांचे त्याच्याशी काय संबंध आहेत. त्यामुळे आम्ही मागणी करत आहोत की, या सगळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी.’ असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT