60 हजारांवर पोहोचलेल्या शेअर मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून चढउतार होताना दिसत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नकारात्मक परिणाम मार्केटमध्येही दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांक 1200 अंकांनी घसरला, तर निफ्टीही घसरण झाली.
ADVERTISEMENT
गुरुवारी 58,795.09 अंकांवर बंद झालेला सेन्सेक्समध्ये शुक्रवारी सकाळीच घसरण झाली. सुरुवातीलाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात सेन्सेक्स 720 अंकानी खाली आला. त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास पुन्हा निर्देशांक 1422 अंकांनी घसरला. त्यामुळे निर्देशांक 58,000 च्या खाली आला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही घसरण झाली आहे.
आशियातील इतर शेअर बाजारांपाठोपाठ भारतीय शेअर बाजारातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नकारात्मक परिणाम दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आला असून, या व्हेरिएंटचा संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचं सांगितलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जास्त संसर्गजन्य असू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हे वृत्त समोर आल्यानंतर शेअर बाजारामध्ये याचे परिणाम दिसून आले. वाढते व्याजदर आणि वाढत्या महागाईमुळे आधीच दडपणाखाली असलेल्या इक्विटी बाजारावर नव्या व्हेरिएंटने आघात केला आहे. या बातमीमुळे आर्थिक व्यवहारांवर पुन्हा लॉकडाउनचं संकट निर्माण होताना दिसत आहे.
नवा व्हेरिएंट आढळून आल्याच्या वृत्तामुळे ऑटो, बँक आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1.5 ते 1.7 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकात फॉर्मा क्षेत्रातील शेअर्स वधारताना दिसले. 2 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. फायझरच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर सिप्ला, कॅडिला, डॉ. रेड्डीजच्या शेअर्सही तेजीत दिसून आले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही नव्या व्हेरिएंटचे परिणाम दिसून आले. सुरुवातीलाच निफ्टीमध्ये 270 अंकांची घसरण होऊन 17,338.75 अंकांवर बाजार उघडला. सकाळच्या सत्रात निफ्टीमध्ये 430 अंकांची घसरण झाली. 11 वाजेच्या सुमारास निफ्टी 17,112.70 अंकांवर होता.
ADVERTISEMENT