बंदी असलेल्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात पतियाळा हाऊस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
आज यासीन मलिकला शिक्षा सुनावली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयासह कश्मिरातील सुरक्षाही वाढवण्यात आली होती. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी यासीन मलिकला १९ मे रोजी दोषी ठरवलं होतं.
दहशतवादी कारवायांसाठी जगभरात जाळं तयार करून निधी गोळ्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने यासीन मलिकला शिक्षा ठोठावली आहे. दुपारी ३.३० वाजता यासीन मलिकला शिक्षा सुनावली जाणार होती. त्यानंतर हा निर्णय ४ वाजेपर्यंत टाळण्यात आला होता.
त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता न्यायालयाने यासीन मलिकला शिक्षा सुनावली. दोन प्रकरणात आजन्म कारावास आणि १० लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिल्लीतील एनआयए न्यायालयाने युक्तीवाद संपल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. न्यायालयात सुनावणी दरम्यान एनआयएने यासीन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
यासीन मलिकवर दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या नावाखाली यासीन मलिकने दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी नेटवर्क निर्माण केल्याचं न्यायालयाने मान्य केलं.
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत ३० मे २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एक डझनपेक्षा अधिक लोकांविरुद्ध १८ जानेवारी २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
एनआयए न्यायालयात सांगितलं होतं की, लश्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जेकेएलएफ, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने कश्मीर खोऱ्यात नागरिक आणि सुरक्षा जवानांवर हल्ले केले. मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला.
यासीन मलिकला शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा, अमित मिश्राने सुनावले खडे बोल
यासीन मलिकने दिली गुन्ह्यांची कबुली
यासीन मलिकने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात भूमिका मांडली. माझ्याविरुद्ध लावण्यात आलेल्या युएपीएचे (UAPA) कलम १६ (दहशतवादी कृत्ये), कलम १७ (दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणं), कलम २८ (दहशतवादी कृत्याचा कट रचणे), कलम २० (दहशतवादी गट आणि संघटनेचा सदस्य असणं) आणि भादंवि कलम १२० ब (गुन्हेगारी कट) व १२४ ए (देशद्रोह) या आरोपांना आव्हान देणार नाही, असं यासीनने न्यायालयात सांगितलं.
यासीन मलिक काय म्हणाला?
न्यायालयात हजर असलेले वकील फरहान यांनी यासीन मलिकने न्यायालयात काय सांगितलं याबद्दलची माहिती दिली. होणाऱ्या शिक्षेबद्दल मला काही बोलायचं नाही, असं यासीन मलिकने न्यायालयात सांगितलं. माझ्याकडून शिक्षेबद्दल कोणत्याही प्रकार भाष्य केलं जाणार नाही. न्यायालयाने योग्य ती शिक्षा द्यावी, असं मलिक म्हणाला होता.
ADVERTISEMENT