मुख्यमंत्र्याच्या शहरातच मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न एका घटनेमुळं उपस्थित झालं आहे. ठाण्यातील मार्केट परिसरात शुक्रवारी एका रिक्षा चालकाने 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला 100 मीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात पीडित तरुणी जखमी झाली आहे. हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत.
ADVERTISEMENT
आरोपीने केले अश्लील हावभाव; तरुणीचं धाडस
याबाबत अधिक वृत्त असे की, पीडित तरुणी ही एका महाविद्यालयात ११ वी मध्ये शिकते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ती बाजारपेठेतून पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालकही त्याठिकाणी होता. त्याने तरूणीकडे पाहून अश्लील हावभाव करत शेरेबाजी केली. तरूणीने धाडस दाखवित या रिक्षा चालकाला जाब विचारला. त्यावेळेस रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तरुणी जखमी झाली तर रिक्षा चालक फरार
परंतु तरूणीने त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली. तसेच त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्त्यात जखमी होऊन पडली. त्यानंतर रिक्षा चालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला.पीडित तरूणी महाविद्यालयातून परतल्यानंतर तिने याप्रकरणाची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. रिक्षा चालकाकडून झालेल्या या प्रकारानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
आरोपीला राहत्या घरातून अटक
पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथकं स्थापन केली होती. काही खबऱ्यांना देखील कामाला लावलं होत. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण याचा आधार घेतला. त्यावेळेस ही रिक्षा नवी मुंबई येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खबऱ्यांकडून माहिती घेतली असता, ही रिक्षा दिघा येथे राहणाऱ्या काटीकादाला याची असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला दिघा येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला लवकरच कोर्टासमोर हजर केलं जाईल.
ADVERTISEMENT