Lockdown च्या काळात अनेक सेलिब्रिटींची ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झाली आहे. त्याची माहिती या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. यामध्ये करणसिंग ग्रोव्हर, नरगिस फाकरी, अक्षय खन्ना यांची नावं आहेत. या यादीत आता शबाना आझमींचंही नाव जोडलं गेलं आहे. त्यांचे ट्विट पाहून लोक त्यांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देत आहेत.
ADVERTISEMENT
हिंदी सिनेसृष्टीच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी गुरूवारी एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी ऑनलाईन मद्यविक्री करणाऱ्या APP ने कशी फसवणूक केली ते सांगितलं आहे. याबाबत शबाना आझमी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एवढंच नाही तर मद्याची डिलिव्हरी देणाऱ्या कंपनीचंही नाव त्यांनी लिहिलं आहे. शबाना आझमी यांनी मद्य मागवलं होतं, त्याचे पैसे तर त्यांनी भरले पण आत्तापर्यंत ती ऑर्डर त्यांच्या घरी आलीच नाही. याबाबत शबाना आझमी यांनी लिहिलेली पोस्ट आणि ट्विट दोन्ही व्हायरल झालं आहे.
काय आहे शबाना आझमी यांचं ट्विट?
सावधान, माझी या लोकांनी फसवणूक केली आहे. कंपनीचं नाव आहे लिव्हिंग लिक्विड्ज. मी या कंपनीला पूर्ण पैसे भरले. मात्र अजूनही माझ्याकडे ऑर्डर आलेली नाही. एवढंच काय यांनी आता माझा फोन घेणंही बंद केलं आहे. असं ट्विट शबाना आझमी यांनी केलं आहे.
शबाना आझमी यांनी त्यांच्या बँक अकाऊंटचे डिटेल्स देऊन आपण कसे पैसे भरले आहेत हे देखील सांगितलं आहे. अर्थात त्यांनी हे सांगितलेलं नाही की मद्य खरेदी करण्यात त्यांची जी फसवणूक झाली आहे त्यात त्यांना किती रूपयांचा फटका बसला आहे?
याआधीही काही सेलिब्रिटींची ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक झाली आहे. ज्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून या सेलिब्रिटींनी दिली आहे. अक्षय खन्ना, नरगिस फाकरी, करणसिंग ग्रोव्हर यांनी याबाबत कशी फसवणूक झाली ती माहिती दिली होती.
शबाना आझमी यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलं आहे की लिव्हिंग लिक्विड्ज च्या मालकाचा शोध लागला आहे. मात्र ज्या लोकांनी माझ्यासोबत फ्रॉड केला त्यांचा आणि लिव्हिंग लिक्विड्जचा काही संबंध नाही. मुंबई पोलिसांकडे मी याप्रकरणी धाव घेतली आहे. त्यांच्या सायबर क्राईम विभागाला मी विनंती करते आहे की अशाप्रकारे फ्रॉड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.
ADVERTISEMENT