पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा त्याच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. यासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतरही शाहिद आफ्रिदीने टीका केली आहे. काश्मीरमधला फुटिरतावादी नेता यासिन मलिक याने टेरर फंडिंग केल्याप्रकरणी NIA कोर्टाने दोषी ठरवलं. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने ट्विट केलं आहे.
ADVERTISEMENT
भारत पाकिस्तानच्या संदर्भातला कुठलाही मुद्दा असला तरीही शाहिद आफ्रिदी त्यावर भाष्य करतो आणि चर्चेत राहतो. आता यावेळी त्याने यासिन मलिकच्या बाजूने ट्विट केलं आहे. शाहिद आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की भारताने मानवाधिकारांचं हनन केलं आहे. या विरोधात मी संयुक्त राष्ट्रांमध्ये धाव घेणार आहे. जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी यासिन मलिक काम करत होता आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणी हस्तक्षेप करणं आवश्यक आहे असं आफ्रिदीने म्हटलं आहे.
आफ्रिदीच्या या ट्विटला लेग स्पिनर अमित मिश्राने तोडीस तोड उत्तर दिलं आहे. तो म्हणाला प्रिय शाहिद त्याने कोर्टात त्याचा दोष कबूल केला आहे. तुझ्या वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे सगळं मिसलीड करणारं असू शकत नाही असं म्हणत अमित मिश्राने उत्तर दिलं आहे. काश्मीरप्रश्नी शाहिद आफ्रिदीने या आधीही भाष्य केलं आहे.
शाहिद आफ्रिदी हा कायमच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार शाहिद आफ्रिदीचा जन्म १ मार्च १९८० ला झाला होता. याचाच अर्थ त्याचं आजचं वय ४२ आहे. मात्र १९९६ मध्ये जेव्हा नैरोबीमध्ये श्रीलंकेच्या विरोधात ३७ चेंडूत त्याने शतक झळकावलं तेव्हा मी १६ वर्षांचाही नव्हतो असं स्वतः आफ्रिदीनेच सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या जन्मतारखेचा घोळ आहे. हाच संदर्भ घेत अमित मिश्राने त्याला सुनावलं आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याप्रकरणी काश्मीरचा फुटिरतावादी नेता यासिन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवलं आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने १९ मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली आहे.
ADVERTISEMENT