मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत आणि अशा अनेक शाहिऱ्या महाराष्ट्राला देणारे शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून म्हणजे ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने शाहीर साबळे यांचा नातू केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा शाहिरांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये हा जीवनपट प्रदर्शित होत आहे. यात शाहिरांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी करत आहे.
ADVERTISEMENT
नातवाने आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मिळ योग जसा या चित्रपटातून जुळून आला आहे, तसाच आणखी एक अभूतपूर्व योग जुळून आला आहे. या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे या करणार आहेत. शाहीर यांनी गायलेली अनेक लोकगीते भानुमती यांनी लिहिली होती. त्यांच्या यशामध्ये भानुमती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचीच महत्त्वाची भूमिका सना केदार शिंदे करत आहे.
चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत
‘महाराष्ट्र शाहीर’ ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे, तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत मिळणार आहेत.
कोण होते शाहीर साबळे?
साताऱ्यातील पसरणी येथे ३ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेले कृष्णराव अर्थात शाहीर साबळे जेमतेम सातवीपर्यंत शिकले होते. लहानपणापासूनच ते सामाजिक चळवळींशी जोडले गेले होते. त्यांनी १९४२ ची चले जाव चळवळ, स्वातंत्र्यानंतरचा गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र अशा चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.
शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या महाराष्ट्र गीतासह ‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी… शोभते खणी, किती नरमणी…’, ‘या गो दांड्यावरून….’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या….’ अशी अनेक दर्जेदार लोकगीते दिली. लोककलेतील या योगदानबद्दल महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
दरम्यान या चित्रपटाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचे योगदान अद्वितीय असेच होते. शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणे म्हणजे भानुमती. त्यामुळे भानुमातीची भूमिका माझी मुलगी करत आहे, हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होतोय, अभिमान वाटतोय.
नातू म्हणून मला शाहीर मोठे वाटतातच, पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचे जीवन खूपच मोठे वाटते. शाहिरांचा जीवनपट या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचे काम गेली अडीच वर्षे सुरू आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसे मिळवले, यश मिळवणे एवढे सोपे असते का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे नव्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळतील, असेही शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT