‘…तर मी काही बोललो नसतो’; गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत शरद पवार अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल काय बोलले?

मुंबई तक

16 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:42 AM)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंग भरत असतानाच आता ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडण्यात आलीये. मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अशीच भूमिका मांडलीये. ही निवडणूक टाळण्याचं आवाहन करताना पवारांनी त्यामागील भूमिका विशद केलीये. शरद पवार यांनी […]

Mumbaitak
follow google news

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंग भरत असतानाच आता ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडण्यात आलीये. मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अशीच भूमिका मांडलीये. ही निवडणूक टाळण्याचं आवाहन करताना पवारांनी त्यामागील भूमिका विशद केलीये.

हे वाचलं का?

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. पवार म्हणाले, ‘अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षाच्या कालावधीसाठी आहे. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा लटके या निवडणूक लढवत आहे. भाजपचे मुरजी पटेल यांनीही अर्ज दाखल केलेला आहे.’

राज ठाकरेंना भाजपनं पत्र लिहायला सांगितलं?; अरविंद सावंतांचं मनसे अध्यक्षांच्या मौनावर बोट

अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल भूमिका मांडताना पवारांनी जुन्या पोटनिवडणुकीचा दाखला दिला. ‘महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली की, गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कुणी उमेदवार उभा राहत असेल, तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही. तसा निर्णयही घेतला’, असं पवार म्हणाले.

‘मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की स्वर्गीय रमेश लटके यांचं मुंबई महापालिका व महाराष्ट्राच्या विधिमंडळातील योगदान आणि निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणं योग होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठ न करता महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असं आवाहन मी सर्वांना करतो’, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपचा उल्लेख न करता ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं.

अंधेरी पोटनिवडणूक : भाजप उमेदवार मागे घेणार? ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांनी मांडली भूमिका

कोल्हापूर, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपनं अशी भूमिका घेतली नव्हती. उमेदवार दिला होता. मग आता अशा प्रकारचं आवाहन? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, ‘एक वर्ष राहिलंय. एका वर्षासाठी निवडणूक… काय आहे निवडणूक एका वर्षासाठी लढवायची आणि त्याचा जो कामाचा बोझा असतो, तो सदस्य आणि कुटुंबियांवर पडतो. ते आम्ही लोकांनी पाहिलेलं आहे. ती निवडणूक तीन-चार सालांसाठी असती, तर मी काही बोललो नसतो. हे एका वर्षासाठी आहे. त्यामुळे निवडणूक टाळता येईल, तर बरं होईल’, असं म्हणत पवारांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

    follow whatsapp