मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो आणि नागपूरमधील अनेकविध प्रकल्पाचे उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाषणादरम्यान, शिंदे-फडणवीस या दोघांनीही पंतप्रधान मोदींसमोर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी समृद्धी महामार्ग साकारत असताना जमीन अधिग्रहण करण्यासाठी विरोध केल्याचं सांगतं हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
मात्र या दोघांनी केलेला दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच वाक्यात खोडून काढला. आज वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री असो त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की समृद्धी मार्गाला विरोधकांनी विरोध केला पण मला माहिती नाही कोणी व कुठे विरोध केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
हा समृद्धीचा महामार्ग आहे आणि ही समृद्धी आहे ती महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची आहे. या महामार्गासाठी भूसंपादनही आम्ही विक्रमी वेळेत केलं. त्यासाठी भूसंपादन कायद्यात सुधारणा केली. पाच पट मोबदला आणि तोही ताबडतोब दिला. त्यामध्ये कोणाची दलाली नाही. पैसे थेट खात्यात जमा केले. त्यामुळे या प्रकल्पात कोणीही प्रकल्पग्रस्त राहिला नाही. सारे प्रकल्पाचे लाभार्थी ठरले.
या महामार्गाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले होते. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अनेकांनी विरोध केला. तर, काहींनी राजकारण केले. अनेक ठिकाणी आंदोलनं सुध्दा झाली. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आणि त्यांच्या मनात सरकारप्रती विश्वास संपादन केला. त्या विश्वासातूनच हा ऐतिहासीक महामार्ग आता उभा राहिला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसमोर म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना हा महामार्ग होणारच नाही असं वाटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यावेळचे नेते महामार्गासाठी अधिग्रहण सुरू असताना विरोध करायला गावांमध्ये जायचे, एकही इंच जमीन देऊ नका, असं आवाहन करत होते. पण तेव्हा सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी गावांमध्ये जाऊन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
ADVERTISEMENT