शिर्डी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने शिर्डी येथे शुक्रवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या पहिल्या दिवशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आजारपणामुळे रुग्णालयातूनच ऑनलाईन उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता. त्यानंतर आज (रविवारी) दुपारी थेट शिर्डीमध्ये व्यासपीठावर उपस्थिती राहुन त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच चार्ज केला.
ADVERTISEMENT
यावेळी दोन्ही हातांमध्ये ड्रेसिंग पट्ट्या, खोल गेलेला आवाज, बोलताना लागणारी धाप यामुळे ते जास्त बोलू शकत नव्हते. त्यामुळे पवार यांनी केवळ चार मिनिटांचं भाषण स्वतः केलं आणि उर्वरित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखविलं. उपचारानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये मी पुन्हा नियमित कामाला लागणार आहे. सध्या तब्येत ठीक नाही. त्यामुळे जास्त बोलू शकत नाही, असं पवार म्हणाले.
शरद पवार भाषणात काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत शुक्रवारपासून अतिशय उत्कृष्ट शिबिर सुरू आहे. शिबिरातील अनेकांची भाषणं मुंबईत हॉस्पिटलमध्ये बसून अन्य मार्गाने ऐकण्याची संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. अतिशय सूत्रबद्ध, उत्तम आणि कार्यकर्ते, सहकाऱ्यांना एक प्रकारची शक्ती देणारे हे अधिवेशन शिर्डीत आयोजित केले आहे.
जयंतरावांकडून मला शिबिराबाबत माहिती मिळत होती. शिर्डीत प्रचंड गर्दी झाली आहे. पण, राज्यातील विशेषतः युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, समाजातील लहान घटकांमध्ये काम करणारे आदिवासी, दलित, भटके विमुक्त अशी सर्वांची शिबिराला यावं अशी इच्छा होती. पण, या सर्वांसाठी स्वतंत्र शिबिर आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. माझी खात्री आहे की, त्यांचा हाही उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचं भाषण वाचून दाखवलं. यामध्ये शरद पवार यांच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसंच या भाषणामध्ये पवारांनी केंद्र सरकारवर केली. संसदीय लोकशाहीमध्ये केंद्रात एक सत्ता आणि राज्यात दुसरी सत्ता असू शकते केंद्र आणि राज्यातील नेतृत्वातील धोरणात अंतर असू शकते.
केंद्रातील सत्तेने राज्यातील नेतृत्वाचा मान राखायला हवा. आज अनेक राज्यामध्ये केंद्रातील विचाराशी सहमत नसलेली सरकारे आहेत. काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता नसताना देखील केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून अवैधानिकरित्या राज्यातील सत्ता हस्तगत केली. अशी टीका पवारांनी केली.
ADVERTISEMENT