मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार की नाही यावर प्रवक्ते दीपक केसरकरांनी खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे मेळावा घ्यायचे. मात्र, शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. म्हणून यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे गट घेऊ शकतात अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. यावर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र यावर आता एकनाथ शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दसरा मेळावाबाबतची एकनाथ शिंदे गटाची भूमिका काय असणार आहे, हे स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले दीपक केसरकर?
दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर माहिती दिली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने काही गोष्टी पुढे आणले आहेत. दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण मानला जातो. यादिवशी सीमोल्लंघन केलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात त्याविषयी केली जाते. दसरा मेळावा आणि बाळासाहेब ठाकरे हा अविभाज्य घटक आहे. ते वेगळं करता येत नाही. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून आम्ही लांब गेलो नाही. त्याच्यामुळे दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये, याबाबत कुठलीही चर्चा एकनाथ शिंदे केली नाहीये, अशी महत्वाची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलीली परंपरा आहे. ती परंपरा पुढे देखील कायम राहायला पाहिजे, अशी एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. याच्यातून कुठलाही वाद निर्माण होता कामा नये. बाळासाहेबांच्या विचाराचं तंतोतंत पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं केसरकर म्हणालेत.
‘मेळावा अमुक ठिकाणीच घ्यावा, असं नाही’ : दीपक केसरकर
मेळावा घेतला जाणार की नाही? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केसरकर म्हणाले, अजूनतरी मेळावा घ्यावा की नाही अशी चर्चा झालेली नाही. जर एकनाथ शिंदेंना वाटलं की मेळावा घ्यावा तर तो अमुक ठिकाणीच घ्यावा असं नाही, असा सूचक इशारा देखील दीपक केसरकर यांनी दसरा मेळावा घेण्याबाबत दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना शिंदे सरकारमध्ये असल्यानं मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही? याबाबत विचारलं असता दीपक केसरकर यांनी न्यायालयाचा दाखला दिला. ते म्हणाले, असं बिलकुल नाही. त्यांनी परवानगी मागावी. कोर्टाचे अनेक निर्वंध आहेत. निर्बंध असताना अशी परवानगी देता येते की नाही? व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेतले जातील, असं केसरकर म्हणाले. शिंदे आणि फडणवीस सरकार सर्वाना समान न्याय देईल. कोणावरही अन्याय करणार नाही, असं देखील त्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT