विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळावरून शिवसेनेनं महाराष्ट्र भाजपसह राज्यपालांवर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं वागत असल्याचा टोला लगावत शिवसेनेनं सामना अग्रलेखात मलिकांच्या अटकेवरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं राज्यपाल आणि भाजपबद्दल काय म्हटलंय?
“राज्याचे घटनात्मक प्रमुखच जेव्हा घटनेची पायमल्ली करतात तेव्हा काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तेच केलं आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्धवट सोडून जावं लागलं. भाजपच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले. त्यांनी ‘जय हिंद’ही म्हटलं नाही व ‘जय महाराष्ट्र’ही म्हटलं नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. अनेक राज्यांच्या विधानसभा अधिवेशनात याआधी राज्यपालांचं भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचं उदाहरण नाही, पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे.”
“विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडविण्यात आलं त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झालं. अलीकडे लोक खाल्ल्या मिठास जागताना तर दिसत नाहीत, पण राज्यपाल महोदय जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. अर्थात त्यामुळे दूध नासणार नाही. त्या दुधाचे दही किंवा लोणी होईल. विरोधी पक्षाने त्यांची घुसळण कायम ठेवली पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःचे पुरते वस्त्रहरण करून घेतले आहे.”
“महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत आहेत. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहेत ते सर्व फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० चे बहुमत कायम आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे?”
“महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधानं केली. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी केलेलं विधान समस्त स्त्रीवर्गाची मान खाली जावी असेच आहे. राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरूचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. याची लाज भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते.”
“मुळात गोंधळ घातला तो विरोधकांनी, म्हणजे भाजपच्या आमदारांनी. महाराष्ट्र सरकारचे एक मंत्री नवाब मलिक हे केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईचे बळी ठरले. दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीशी जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप करून त्यांना अटक केली गेली. या सर्व प्रकरणातले गौडबंगाल न्यायालयातच समोर आलं. जमिनीची किंमत ५५ लाख की ५ लाख यावरच ‘ईडी’वाले गडबडले. ऊठसूट एखाद्याचा दाऊदशी संबंध जोडायचा व बदनाम करायचे. हा त्यांचा धंदा जुनाच आहे, पण याच भाजपच्या राष्ट्रीय तिजोरीत दाऊदशी संबंधित लोकांनी काही कोटी रुपयांच्या देणग्या देऊन भाजपच्या राष्ट्रकार्यावर चार चाँद लावले आहेत. त्याच दाऊदच्या पैशांवर भाजप देशातील, जगातील सर्वात मोठा पक्ष बनला असेल तर तसे स्पष्ट करा.”
“दाऊद हा राष्ट्रद्रोही आहेच व त्याला पाकिस्तानातून इकडे फरफटत आणायला पंतप्रधान मोदी यांना कोणीच थांबवलेले नाही. वाटल्यास महाराष्ट्रातील भाजप मंडळाचे पथक मोदी यांनी कराचीत पाठवून दाऊदच्या मुसक्या बांधून आणावे, पण दाऊदच्या नावावर राजकीय भाकरीचे तुकडे तोडणे थांबवा एवढेच आमचे सांगणे आहे. दाऊदच्या विरुद्ध नारेबाजी करून काय फायदा?”
“हिंमत असेल तर दिल्लीतील सरकारने पाकिस्तानात घुसून त्याला खतम करण्याचे शौर्य दाखवावं, पण भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे व त्यासाठी त्यांनी विधिमंडळात घटनेचा बळी दिला. मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्यास साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव! महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात व शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग राग इतिहासात कोणी केला नसेल.”
ADVERTISEMENT