Inflation : ‘नटीच्या बेकायदा बांधकामावरील कारवाईनंतर हाय तौबा करणारे महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर गप्प का?’

मुंबई तक

• 02:08 AM • 15 Jul 2021

देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस आणि सीएनजी या सगळ्याचे दर वाढले आहेत. यावरून आता शिवसेनेने मोदी सरकारवर आणि राज्यात कुठल्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘बहोत हो गयी मेंहगाई की मार अब की बार मोदी सरकार’ या घोषवाक्यावर […]

Mumbaitak
follow google news

देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस आणि सीएनजी या सगळ्याचे दर वाढले आहेत. यावरून आता शिवसेनेने मोदी सरकारवर आणि राज्यात कुठल्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘बहोत हो गयी मेंहगाई की मार अब की बार मोदी सरकार’ या घोषवाक्यावर विश्वास ठेवून भारतातल्या जनतेने मोदी सरकारला सलग दोनदा निवडून दिलं. मात्र आता मोदी सरकारला या घोषणेचाच विसर पडला आहे असंही अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हटलं आहे अग्रलेखात?

पेट्रोल, डिझेलचे दर रोज वाढत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही भडकत आहेत. सीएनजीच्या किंमतीत किलोमागे 2.58 रूपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर सीएनजीची किंमत 52 रूपयांच्या घरात पोहचली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही दरवाढ म्हणजे मोठा झटकाच आहे. सीएनजीसोबत घरगुती पाईपलाईन गॅसची किंमतही प्रत्येक युनिटमागे 55 पैशांनी वाढवण्यात आली आहे. आधीच कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. संतापाची बाब अशी की, सरकारने पंधरा दिवसात दुसऱ्यांदा महागाईच्या आगीत तेल ओतण्याचा उद्योग केला आहे.

याच महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारने गॅस सिलिंडरचे दर 25 रूपयांनी वाढवले होते. सरकारने घरगुती गॅसच्या दरात तर जबर वाढ केलीच पण चहा टपरीपासून छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक, केटरिंग चालक जो गॅस वापरतात, त्यात ८४ रूपयांची वाढ केली. ही दरवाढ कधी तर जेव्हा कोरोनामुळे सगळे ठप्प पडले आहे. कोरोनासारख्या संकटकाळात गॅसचे दर 25 आणि 84 रूपयांनी वाढवणं याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारच्या संवेदना हरवल्या.

एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयांवर हाय तौबा माजवणारी मंडळी आता महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर तोंड उघडायला तयार नाही. कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेरासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे. सत्तेवर येण्यासाठी निवडणूक प्रचारात वापरलेली बहोत हो गयी महंगाई की मार.. या घोषवाक्याची टॅगलाईनही आता कुठेच नजरेला पडत नाही. आता महागाई दूर होणार, खिशात पैसेच पैसे खुळखुळणार, अच्छे दिन येणार या भाबड्या समजुतीतून देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतेने भाजपच्या पात्रात भरभरून भरघोस मतदान टाकले. केंद्रात लागोपाठ दोनवेळा भाजपचे सरकार बहुमताने निवडून दिले. मात्र सत्तेवर येऊन सात वर्षे झाली तरीही केंद्र सरकारला महागाईचा राक्षस मारता आलेला नाही. उलट महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतोच आहे.

    follow whatsapp