मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपला मतदारसंघ सोडलेले शिवसेनेच्या माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेनं आता मोठं गिफ्ट दिलं आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सुनील शिंदे यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांचा मात्र पत्ता कापण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने विधान परिषदेची उमदेवारी दिल्याचं खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वरळीची जागा सोडली होती. याच मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. या विजयात सुनील शिंदे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच आता त्यांना विधान परिषदेवर पाठवून पक्षानेही त्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांपैकी रामदास कदम आणि भाई जगताप यांच्या सदस्य पदाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे.
14 डिसेंबरला निकाल
निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहीर केला. 16 नोव्हेंबरला निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असून, 24 नोव्हेंबरला दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर असून, 10 डिसेंबरला मतदान आणि 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महारष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणुका पार पडणार आहे. अशावेळी शिवसेनेकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लावणार याबाबत वेगवेगळ्य नावांची चर्चा सुरु होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी आली आहे. यावेळी माजी मंत्री आणि आमदार सचिन अहिर यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं समजतं आहे.
कोण आहेत सुनील शिंदे
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मंत्री सचिन अहिर यांचा पराभव केला होता. पण, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.
शिवसेनेच्या या निर्णयामुळे सुनील शिंदे यांना आपला हक्काचा मतदारसंघ सोडावा लागला होता. पण त्यानंतरही सुनील शिंदे हे याच मतदारसंघात आणि संघटनेत पक्षाचं काम जोमाने करत राहिल्याने आता पक्षाने देखील त्यांच्यावर विश्वास दाखवत विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार होण्यापूर्वी सुनील शिंदे हे मुंबई महापालिकेत सर्व प्रथम नगरसेवक होते. 2007 साली नगरसेवक म्हणून ते मुंबई महापालिकेत निवडून गेले होते. यावेळी त्यांना मानाचं समजलं जाणारं बेस्ट समितीचे अध्यक्षपदही देण्यात आलं होतं. त्यानतंर 2014 विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतून त्यांना पक्षाने तिकिट दिलं होतं. यावेळी सचिन अहिर यांचा पराभव करुन सुनील शिंदे हे जाईंट किलर ठरले होते.
आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडणारे सुनील शिंदे कोण आहेत?
रामदास कदमांचा पत्ता कट?
दुसरीकडे, शिवसेने दिग्गज नेते रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यास पक्ष तयार नसल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती. याच ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदमांनीच किरीट सोमय्याांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिलं असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. या सगळ्या प्रकारामुळेच राम कदम यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली नसल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT