शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अभूतपूर्व बंड ठरलं आहे. ३६ हून जास्त आमदारांना सोबत घेत त्यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेसोबत आता १३ आमदार उरले आहेत. या सगळ्या राजकीय पेच प्रसंगाचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना एक महत्त्वाची ऑफर दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
”सगळ्या बंडखोर आमदारांना माझं सांगणं आहे की तुम्ही तिकडे बसून पत्रव्यवहार, व्हॉट्स अॅप या सगळ्याद्वारे संपर्क साधू नका. मुंबईत या समोरासमोर बसा. तुमचं काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडा. महाविकास आघाडीबाबत समस्या तुम्हाला असतील तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे” हे संजय राऊत यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड सर्वात मोठं बंड मानलं जातं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही भावनिक साद घालत ज्या काही तक्रारी असतील त्या समोर या आणि सांगा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यापाठोपाठ पुढच्या २४ तासात मुंबईत या आणि चर्चा करा महाविकास आघाडीतून बाहेर पडू ही ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे. या ऑफरबाबत एकनाथ शिंदे यांचा गट काही निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे तो एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलंय. राजकीय पेच राज्यात निर्माण झाला आहे. २१ जूनला हे बंड पुकारण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत.
शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहे. या नेत्यांना बडवे आणि कारकून चाणक्य असं म्हणत संजय शिरसाट यांनी गेल्या अडीच वर्षांपासून घडत असलेला प्रकार निदर्शनास आणून दिलाय.
त्यांनी पत्रात नाराजी व्यक्त केली असून हे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. तसंच आमदारांचं म्हणणं हेच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह सगळ्याच बंडखोर आमदारांना ही ऑफर दिली आहे.
ADVERTISEMENT