शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देत मंत्रालयात आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे महेश शिंदे यांच्या आंदोलनाची चर्चा अधिवेशन परिसरात सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या पायऱ्यांवर बसून महेश शिंदे यांनी आंदोलन सुरू केलं आहे.
ADVERTISEMENT
हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
सामान्य ग्राहकांच्या वीज बिलाची लूट थांबवा, शेतकऱ्यांच्या वीज तोडण्या थांबवा, महावितरणच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध अशा पाट्या घेऊन त्यांनी मूक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. अशात एका शिवसेनेच्याच आमदाराने पुकारलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरतंय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधकांचं तर मुळीच ऐकत नाही आता किमान आपल्या पक्षाच्या आमदारांचं तरी ऐकतील असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे; नक्कल पाहून देवेंद्र फडणवीस भडकले
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस भास्कर जाधव विरूद्ध भाजप असा रंगला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी हाती बोर्ड घेऊन असं मूक आंदोलन पुकारलं ज्याची चर्चा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही झाली. वीज तोडण्यांचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात उपस्थित केला होता. तसंच पेपरफुटीवरूनही त्यांनी टीका केली होती. वीज तोडण्यांचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्याला उत्तर द्यायला उर्जामंत्री नितीन राऊत उभे राहिले होते. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. ज्यानंतर वातावरण तापलं आणि दोनवेळा सभागृह तहकूब करावं लागलं.
गदारोळानंतर जेव्हा कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागत देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग आणू हे आव्हान दिलं होतं तेदेखील स्वीकारलं. पहिला दिवस भास्कर जाधव विरूद्ध भाजप असा गेला. आता दुसऱ्या दिवशी आमदार महेश शिंदे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची चर्चा होते आहे.
ADVERTISEMENT