गुजराती-मारवाडी लोकांना बाहेर काढले, तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही, या विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आता तर मराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की, तो अपराध ठरतो’, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईडीच्या कारवायांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी रोखठोक या साप्ताहिक स्तंभातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे. “राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधानं केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे.”
“कोश्यारी यांनी त्यांच्या एका भाषणात काय सांगितलं? ‘गुजराती व मारवाडी लोक मुंबईत आहेत म्हणून मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. गुजराती-मारवाडी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही.’ राज्यपालांचं हे विधान निर्हेतुक कसे असेल?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
भाजप नेत्यांवर संजय राऊतांची टीका
“मुंबईतील गुजराती-मारवाडी समाजाच्या लोकांनाही श्री. कोश्यारी यांचे विधान आवडले नाही व त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा करताच ज्यांचे पित्त खवळले, त्यांनी महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध केला नाही. हासुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपवरही निशाणा साधला आहे.
दुधात मिठाचा खडा का टाकायचा?; संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींना सवाल
“मराठी धनिक लोक हे कधीच व्यापारी वृत्तीने वागले नाहीत. आपल्या मुंबईसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. गुजराती, पारशी, मराठी असा हा त्रिवेणी संगम मुंबईत महत्त्वाचा ठरतो. मुंबईत आलेला गुजराती समाज पुढे येथे दुधात साखर विरघळावी तसा विरघळून गेला. मुंबईचे अर्थकारण तो चालवतो हे खरे. म्हणून येथील श्रमिकांचे महत्त्व कमी होत नाही. गुजरात व महाराष्ट्र पूर्वी एकच राज्य होते. आज ती जुळी भावंडे बनली आहेत. मग उगाच दुधात मिठाचा खडा का टाकायचा?”, असा सवाल संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना केला आहे.
“गुजराती व मारवाडी लोकांनी मुंबईत येऊन व्यापार केला व पैसा कमावला, टाटांपासून अंबानींपर्यंत सगळ्यांचं वास्तव्य मुंबईत आहे हेसुद्धा वैभवाचेच लक्षण आहे. बडोद्याचा विकास सयाजीराव गायकवाड यांनी केला. इंदूरवर होळकर व ग्वाल्हेरवर शिंद्यांचा पगडा आहे. मुंबईचे अर्थकारण गुजराती-राजस्थानी लोकांच्या हाती असेल तर त्याबाबत वाईट का वाटावे?”
“राज्यपाल कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे विषयावर पडदा पडला असला तरी मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील. ती कायमचीच थांबवायला हवीत!”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या कारवायांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना संजय राऊत काय म्हणाले?
“मुंबईचे सिने जगत हे तेव्हा व आजही पंजाबी लोकांच्या नियंत्रणाखाली होते, पण लता मंगेशकरही तेजाने तळपत होत्याच. महाराष्ट्राच्या भूगोलावर मुंबई आहे व मुंबईवर मराठी माणसांचा पहिला हक्क आहे. पैशात तो कमी असेल आणि आता तर मराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की, तो अपराध ठरतो. मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला. राज्यपाल महोदय, कधीतरी यावरही बोला. पैसा मिळेल त्या मार्गाने मिळवायची संधी आज एकाच प्रांताला व समुदायाला मिळत आहे. त्यामुळे मुंबईचेच नव्हे तर इतर प्रांतांचेही अर्थकारण बिघडले”, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT