त्रिशूळ ते मशाल! ठाकरे गटाने आयोगाकडे चिन्हासाठी पर्याय दिले? अनिल देसाईंनी दिलं उत्तर

मुंबई तक

• 06:12 AM • 09 Oct 2022

शिंदे-ठाकरेंच्या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यानंतर शिवसेनेकडून चिन्हासाठी आणि पक्ष नाव म्हणून प्रत्येकी तीन नावं सुचवण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. त्यावर आता ठाकरे गटाकडूनच खुलासा करण्यात आलाय. ठाकरे गटाचे अनिल देसाईंनी यावर भूमिका मांडली, तसेच उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचंही सांगितलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अनिल […]

Mumbaitak
follow google news

शिंदे-ठाकरेंच्या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यानंतर शिवसेनेकडून चिन्हासाठी आणि पक्ष नाव म्हणून प्रत्येकी तीन नावं सुचवण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. त्यावर आता ठाकरे गटाकडूनच खुलासा करण्यात आलाय. ठाकरे गटाचे अनिल देसाईंनी यावर भूमिका मांडली, तसेच उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचंही सांगितलं.

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अनिल देसाईंनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. अनिल देसाई म्हणाले, “अनाकलनीय निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. अशी अपेक्षा होती की, काल सुपूर्द केलेल्या पुराव्यानंतर त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून सोमवारी दोन्ही गटांना किंवा आमची एक सुनावणी घेतील. सुनावणी झाल्यानंतर सादर कागदपत्रांच्या आधारे ते निर्णय घेतील”, असं म्हणत देसाईंनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनिल देसाई काय म्हणाले?

“आता निवडणूक आयोगाने आदेशात म्हटलंय की, पोटनिवडणूक तोंडावर आहे. वेळ कमी आहे, अशी कारणं दिलेली आहेत. पण, शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे. सोमवारी दोन्ही पक्षकारांना संधी दिली असती, तर हे न्यायाच्या चौकटीत काम होतंय असं वाटलं असतं”, असं सांगत देसाईंनी एकूण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

“देशातली निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि निरपेक्ष करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ ने सोपवलेली आहे. त्यात फार मोठ्या जबाबदाऱ्या निवडणूक आयोगावर आहेत. सिम्बॉल ऑर्डरमध्येही तशी नोंद आहे. त्या गोष्टी बाजूला ठेवून अशा प्रकारचा धक्कादायक निर्णय देणं हे मुळातच अपेक्षित नव्हतं”, असंही देसाईंनी म्हटलंय.

“निवडणूक आयोगाने दिलेल्या पर्यायानुसार कशापद्धतीनं पुढे जायचं यासंदर्भातली बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. यात सर्वाचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहे. त्या बैठकीत निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती अनिल देसाईंनी दिली.

त्रिशुल, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय ठाकरे गटाने सूचवल्याची चर्चा होतेय. त्यावर अनिल देसाई म्हणाले, “ज्या गोष्टींची आम्हाला कल्पना नाही. अशा गोष्टी माध्यमांना अगदी जिथे न पोहचे रवी तिथे पोहचे कवी अशा पद्धतीनं पसरवल्या जाताहेत. पण, जे काही चिन्ह असेल, त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. आम्हाला आमच्या अपेक्षप्रमाणे चिन्ह मिळावं असं नक्कीच वाटतं. कारण राज्यातील महत्त्वाचा पक्ष आहे. माध्यमांमधून चिन्ह आणि नावांच्या पर्यायाची माहिती दिली जात आहे. पण अशाप्रकारचं काहीही नाहीये. त्यासाठीच आम्ही दुपारची बैठक बोलावली आहे”, अशी भूमिका अनिल देसाईंनी मांडली.

उद्धव ठाकरेंच्या बैठकीपूर्वी ठाकरे गटाकडून तीन पर्याय सुचवण्यात आल्याचं वृत्त झळकलं. उद्धव ठाकरेंनी त्रीशुल, उगवता सूर्य, मशाल असे तीन पर्याय चिन्हासाठी आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्याय दिले गेल्याचं म्हटलं गेलं होतं. ते वृत्त अनिल देसाईंनी फेटाळून लावलं.

    follow whatsapp