शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या वर्षापर्यंत फक्त एकच होत असे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये हाच दसरा मेळावा दोन नेत्यांचा होणार आहे. एक नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरा नेता म्हणजे परंपरागत चालत आलेले शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचा.
ADVERTISEMENT
आता ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…’ असं घोष वाक्य शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं असलं तरी सध्या त्याची फोड केल्यास एक झेंडा, दोन नेते, दोन मैदान असं झालं आहे. धनुष्यबाण, खरी शिवसेना, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी स्वत:च्याच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. तो वाद सध्या सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगासमोर आहे.
पण आपण त्या वादात न जाता थेट शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानावर चर्चा करु. आजचा मुद्दा हाच आहे की बीकेसी की शिवतीर्थ मैदान… ऐतिहासिक सभांसाठी कुठलं मैदान सर्वाधिक गाजलंय?
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामुळे जे मैदान सर्वाधिक चर्चेत आलंय ते वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स इथल्या MMRDA च्या मैदानाबद्दल जाणून घेऊ.
-
ज्यांच्या लोकपाल आंदोलनाचं अख्या देशानं कौतुक केलं त्या अन्ना हजारे यांनी 27 डिसेंबर 2011 मध्ये याच मैदानावर 3 दिवस उपोषण केलं होतं.
-
त्यानंतर सगळ्यात मोठी सभा झाली ती बाळासाहेब ठाकरे यांची. पालिका निवडणुकीमध्ये महायुतीची घोषणा झाली आणि बाळासाहेब ठाकरे यांची फेब्रुवारी 2012 मध्ये याच बीकेसीतल्या मैदानावर जाहीर सभा झाली. ही सभा बाळासाहेबांची बेकीसीमधील शेवटची सभा ठरली.
-
22 डिसेंबर 2013 रोजी नरेंद्र मोदींनी याच मैदानावर महागर्जनाची सभा घेतली होती. लोकसभा निवडणुकीवेळी झालेली ही सभा महाराष्ट्रात वातावरण बदलवणारी ठरली.
-
2014 च्या याच लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही याच मैदनावर सभा घेतली होती.
-
26 एप्रिल 2019 रोजी महायुतीची विजय संकल्प सभा बीकेसीतील याच मैदानावर पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर उपस्थित होते. याच सभेनंतर झालेलं सत्तांतर तुमच्यासमोर आहे.
आता विषय येतो तो म्हणजे शिवतीर्थचा.
-
आधी शिवाजी पार्क, नंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि शिवसेनेचे शिवतीर्थ अशा नावाने हे मैदान ओळखलं जातं
-
1 मे 1960 महाराष्ट्राला मुंबई मिळाल्याचा दिवस. याच दिवशी शिवतीर्थावर मुंबई महाराष्ट्राला मिळाली याचा सोहळा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश सोहळा पार पडला.
-
शिवसेना आणि मनसेच्या सभांमुळे हे मैदान चांगलंच ओळखलं जातं. ऐतिहासिक सभा झाल्याचा शिवतीर्थाचा खास अंदाज आहे. शिवसेना निर्माण झाल्यानंतरची पहिल्या सभेचा साक्षीदार शिवतीर्थ आहेच.
-
पुढे शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने शिवतीर्थावर या, या वाक्याची सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा इथं होऊ लागल्या. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी तो वारसा पुढे चालवला.
-
1977 साली आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, याच विरोधात समाजवादी पक्ष, जनसंघ, राष्ट्रीय लोकदल असे पक्ष एकत्र येत जनता पक्षाची स्थापना झाली हाच पक्ष देशाच्या आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. विजयानंतर शिवाजी पार्कवर जनता पक्षाची विशाल सभा झाली आणि याच सभेनंतर जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला केला.
-
19 मार्च 2006 रोजी मनसेचे प्रमुख झाल्यानंतर राज ठाकरेंनी या शिवाजीपार्कवर पहिलं भाषण केलं. मनसेच्या स्थापनेनंतर झालेली ही पहिली जाहीर सभा होती आणि इथूनच मनसेची भूमिका पुढे येऊ लागली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पाडव्यादिवशी राज ठाकरे यांची याच शिवतीर्थावर सभा होत असते. राज ठाकरे यांच्या राजकीय सभाही या मैदानात गाजल्या आहेत.
राजकीय सभा असो की इतर, शिवतीर्थांला ऐतिहासिक सभांचा वारसा लाभला आहे, हे विसरुन चालणार नाही. एकीकडे BKC आणि दुसरीकडे शिवतीर्थ. या सगळ्यांमध्ये शिवतीर्थाचा इतिहास धगधगता आहे, हेही विसरुन चालणार नाही, हे नक्की.
ADVERTISEMENT