Uddhav Thackeray : “दोघेजण दिल्लीत चकरा मारत आहेत, पाळणा काही हलत नाही”

मुंबई तक

• 03:52 PM • 08 Aug 2022

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्टला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ९ आमदार मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना फोन गेले असून मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दोघे दिल्लीत चकरा […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्टला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ९ आमदार मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना फोन गेले असून मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दोघे दिल्लीत चकरा मारत आहेत मात्र पाळणा काही हलत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

हे वाचलं का?

Uddhav Thackeray : “आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, कुणी हात लावायचा प्रयत्न केला….”

काय म्हटलं आहे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी?

दिल्लीत दोघंजण चकरा मारत आहेत, पण पाळणा काही हलत नाही. आता बातमी आली आहे की मंगळवारी (९ ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार? शिवसेनेवर टीका करत होते. संपलेला पक्ष म्हणत आहेत. मात्र मैदानात उतरा ना.. आणि हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान देत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. तसंच मी आता मैदानात उतरलो आहे, पळणार नाही. निष्ठा आणि पैसा यांच्यात ही लढाई आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ताकद कुणाची शिवसेनेची अशा घोषणाही यावेळी इथे जमलेल्या शिवसैनिकांनी दिल्या.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांना?

मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही सगळे जोडले जात आहात. महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दारांना गाडते. भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांचं नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही. भगवा झेंडा मात्र तसाच फडकतो आहे. गद्दारांच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याच्या भाषा केली जात आहे. यांना नंतर लक्षात येईल की वापर करून कसं फेकून दिलं जातं. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी वार करणार असेल तर त्याचा नायनाट करणं हे आपलं कर्तव्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. असं वक्तव्य करत आपल्या खास ठाकरी शैलीत त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात जो राजकीय भूकंप झाला त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या गटाने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे नव्याने पक्ष बांधणी करत आहेत. अशा सगळ्यात मातोश्रीवर येणाऱ्या लोकांचा ओढा वाढतो आहे. आज त्यांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे.

    follow whatsapp