मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार हे नवीन निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी याबाबत एक परिपत्रक जारी करुन माहिती दिली. शिंदे गटाने आयोगाला तळपता सुर्य, पिंपळाचे झाड आणि ढाल-तलवार अशा ३ चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यानंतर आयोगाने त्यांना ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. याशिवाय कालच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाकडून यापूर्वी आयोगाला उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा अशा चिन्हांचे पर्याय देण्यात आले होते. मात्र उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याने तर त्रिशूळ आणि गदा ही धार्मिक चिन्ह असल्याचे कारण देत बाद ठरविण्यात आली. त्यामुळे शिंदे गटाला मंगळवारी सकाळपर्यंत नवीन चिन्हांचे पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने आज मेलद्वारे तळपता सुर्य, पिंपळाचे झाड आणि ढाल-तलवार हे तीन पर्याय आयोगाला पाठविले होते.
निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबरच्या रात्री शिवसेनेतील शिंदे-ठाकरे वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही गटांना (१० ऑक्टोबर) सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत नवीन नावं आणि मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांचे ३ पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. यानुसार दोन्ही गटांकडून नवीन नाव आणि चिन्हांचे ३ पर्याय देण्यात आले होते. यात काही चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीच्या बाहेरची होती.
ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे ३ पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. तर शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या ३ नावांचा पर्याय सुचविला होता. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाव तर ‘मशाल’ चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे आता राजकीय मैदानात मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे.
ADVERTISEMENT