काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं कडवं आव्हान मोडून काढत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पॅनलने बाजी मारली. ११ विरुद्ध ८ अशा फरकाने पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर नारायण राणेंचीच सत्ता असणार आहे. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाविकास आघाडीसह शिवसेनेवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावरही नारायण राणे समर्थकांनी एक कार्टून शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे. वाघाची शेपटी हातात धरुन त्याला बँकेत जाण्यापासून नारायण राणे रोखत असल्याचं या चित्रात दाखवलं आहे. शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी यावरुन राणेंना चांगलाच टोला लगावला आहे.
“पूर्वी नाराळावरच्या कुस्त्या व्हायच्या. बत्ताशावरचे पैलवान असायचे. हे असंच आहे, नाराळावरची कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीशी बरोबरी केल्याचं दाखवायचं. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादीत स्वरुपाच्या असतात. जनमताचा कौल घ्यायचा असेल तर नारायण राणेंनी पुढे यावं म्हणजे त्यांना कोकणातली शिवसेना काय आहे हे कळेल.”
एका हाती पोस्टर एका हाती गम घेऊन महाराष्ट्रात फिरा, तीच तुमची लायकी; नारायण राणेंनी शिवसेनेला सुनावलं
दुसरीकडे अजित पवारांनीही बारामतीत बोलत असताना जिल्हा बँकेच्या निकालांवरुन राणेंवर टीका केली आहे. “जिल्हा बँकेसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केले पण त्यात यश आलं नाही. ज्यांना यश आलं त्यांचं अभिनंदन. त्यांनी बँक चांगली चालवावी यासाठी आमच्या शुभेच्छा.” नारायण राणेंनी अजित पवारांवर टीका करताना अर्थमंत्री कोकणात येऊन गेले पण त्यांनी विकासासाठी काहीच योगदान दिलं नाही अशी टीका केली होती.
ज्याला उत्तर देताना अजित पवारांनी, माझ्याकडे जेव्हा जेव्हा अर्थमंत्रीपद आलं तेव्हा तेव्हा मी कोकणाला भरभरुन मदत केली आहे असं सांगितलं. “मध्यंतरी तौक्ते वादळ आलं त्यावेळेस आम्ही मदत केली, मुख्यमंत्र्यांनीही मदत केली. निसर्ग वादळाच्या वेळेसही मदत केली. आता रेडी ते रावस एवढा मोठा रस्ता मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वीच १९० कोटींचा बंधारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर केला आहे. कोकणाच्या विकासासाठी जे जे करणे शक्य आहे ते आम्ही करत आहोत. उगाच एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत त्यांनी केंद्र सरकारकडून कोकणच्या विकासासाठी निधी आणावा. राज्य सरकारच्या वतीने जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करून करून कोकणचा कायापालट करू”.
ADVERTISEMENT