अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव रमले शेतीच्या कामात

मुंबई तक

• 10:09 AM • 06 Jul 2022

महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आता शेतीच्या कामात रमले आहेत. विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. भास्कर जाधव […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आता शेतीच्या कामात रमले आहेत. विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात.

हे वाचलं का?

भास्कर जाधव आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं. समाजकारण तसंच राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस ते चालू शकले नव्हते. परंतु, त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पाहण्यास मिळाले.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे -भास्कर जाधव

भास्कर जाधव यांनी काय म्हटलं आहे?

”दरवर्षी आम्ही या ठिकाणी शेती करायला या गावी येतो. माझे आजोबा, माझे वडील यांच्यापासूनच आम्ही सगळेजण शेती करतो. आम्ही तीन भाऊ आहोत. माझा मुलगा, माझे पुतणे सगळे या शेतात काम करण्यासाठी येतात. आम्ही कधीही एकही पैशांचं रेशनिंगचं किंवा खुल्या बाजारातलं धान्य खात नाही. शेतात पिकवलेलंच धान्य आम्ही आमच्या घरांमध्ये खातो. आम्हाला सर्वांना दोन सिझनला येण्याचा दंडक वडिलांनी घालून दिला आहे. ते दोन सिझन आहेत लावणी आणि कापणी. या दोन सिझनला आम्ही येतोच. शेतात काम करण्याचा एक वेगळ संमाधान संपतं. गेले तीन दिवस परशूराम घाट वाहतुकीसाठी बंद होता. तिथे अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या. तिथेच बैठकही घेतली. त्यानंतर मी माझ्या शेतात काम करण्यासाठी आलो आहे.”

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की, देवेंद्र फडणवीस; श्रीमंतीत कोण कुणाला भारी?

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची नव्याने मशागत करत आहेत त्याबद्दल काय सांगाल असं विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेना नावाचं जे शेत आहे त्याची मालकी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्यांनी ती मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे. शिवसेना नावाचं जे शेत आहे त्यात माझ्यासारखे अनेक शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ते हे या शिवसेनारूपी शेताची मशागत करण्यासाठी कंबर कसून तयार आहेत.

ही गोष्ट जरी खरी असली तरीही उद्धव ठाकरे हे मालक आहेत. कोणत्या शेतात कुणाला मशागतीत पाठवायचं, कुणाला किती बी बियाणं द्यायचं, कुणाला किती पाणी आणि खत द्यायचं हे सगळं ठरवणारे उद्धव ठाकरेच आहेत. ते याबद्दल योग्य तो निर्णय घेऊन ही शिवसेना नावाची शेती पुन्हा एकदा फुलवतील यात शंका नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. २१ जूनला शिवसेनेत मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे आमदारांचा एक मोठा गट घेऊन बाहेर पडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. ते झाल्यावर भास्कर जाधव हे आपल्या गावी आले आहेत. तसंच सध्या ते शेतकामात व्यस्त आहेत.

    follow whatsapp