मुंबई : आमचं पहिलं टार्गेट मुंबई मनपा आहे, मी स्वतः यावर लक्ष ठेऊन असणार आहे, असं म्हणतं खासदार गजानन किर्तीकर यांनी आगामी काळात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले. ते मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. किर्तीकर यांनी शुक्रवारी रात्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT
किर्तीकर यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप :
यावेळी बोलताना किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, माझी शिवसेनेतील आतापर्यंतची 56 वर्षांची कारकिर्द. यापैकी 45 वर्ष बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि 11 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केले. आता उर्वरित आयुष्य आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेवर प्रेम असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे काही अपमान असतील ते सहन केले. 2004 च्या निवडणुकीत माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न झाला. 2009 ला तिकीट कापलं. 2014 आणि 2019 ला मी निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्रिपदी डावललं. माझ्यापेक्षा अत्यंत ज्यूनिअर खासदारांना ही पद दिली. लोकसभेचं गटनेतेपदही दिलं नाही. त्यामुळे निष्ठावंत आणि ज्येष्ठ एवढीच बिरुदावली माझ्याकडे राहिली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही सहन करत राहिलो.
शिवसेना पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेसच्या दावणीला बांधला :
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी जो उठाव केला त्याला खरोखरचं कारण आहेत. त्याला ईडी आणि खोकं हे कारण नाही. शिवसेना खरोखरचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली. तसंच जर हाच प्रवास पुढे होणार असेल त्याला आम्ही सर्वांनी सक्त विरोध केला.
आम्ही खासदारांच्या मिटिंगमध्ये हे आधोरेखित केलं. पण त्यावर त्यांनी काही विचार केला नाही. काल आदित्य ठाकरे भारत जोडोमध्ये सहभागी झाले. याचा अर्थ त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. आमचा त्यांना पाठिंबा नाही. त्यामुळे 12 खासदार गेले, मी 13 वा झालो.
आमचा मुख्यमंत्री असताना काम होत नव्हती :
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक कार्यकर्ते-आमदार यांची कामे होत नव्हती. याबाबत अनेकदा जिल्ह्यातील पदाधिकारी, आमदार यांनी तक्रार केली होती. हेच उठावाचे कारण होते. एकनाथ शिंदेंसह सर्वजण हेच सांगत होते की राष्ट्रवादीमुळे उपद्रव होतो आहे. त्यामुळे हा उठाव झाला आणि भाजप सेनेची नैसर्गिक युती शिंदे यांनी स्वीकारली.
एकनाथ शिंदे यांचे कौतुक :
यावेळी किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंड भरुन कौतुक केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे लोकनेते आहेत. त्यांना बळ देणे कर्तव्य हे माझे आहे, बाळासाहेबांची शिवसेना ते पुढे नेत आहेत. त्यामुळे कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता, मागणी न करता पक्ष बळकट करण्याचे काम करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT