देवेंद्र फडणवीस जो बॉम्ब घेऊन आले तो भिजलेला लवंगी फटाका निघाला असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ज्या अहवालाची गोष्ट देवेंद्र फडणवीस सांगत आहेत त्याचा पत्रकारांनी नीट अभ्यास करावा त्यामध्ये ठाकरे सरकार अडचणीत येईल असा एकही मुद्दा नाही असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
काल मी जो अहवाल दिला तो बॉम्ब होता की लवंगी फटका हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटका होता असं संजय राऊत म्हणत आहेत तर मग एवढे घाबरले कशासाठी? असा प्रतिप्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदल्यांबाबत केलेलं वक्तव्य दिशाभूल करणारं-नवाब मलिक
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पोलीस बदलीच्या रॅकेटच्या आरोपांची खिल्ली उडवली. दिल्लीत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी यायला पाहिजे, दिल्लीवर महाराष्ट्राच प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आले ते चांगलंच आहे. ते जो काही कागद घेऊन इथे आले होते तो बॉम्ब नव्हता तर भिजलेला लवंगी फटाका होता. जी कागदपत्रं त्यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे दिली त्यात काडीचाही दम नाही. फडणवीसांनी केलेले आरोप गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल.
महाराष्ट्रात जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे काही अधिकारी असू शकतात. त्यांनी चांगल्या हेतूने काही कागदपत्रं तयार केली असतील असाही चिमटा संजय राऊत यांनी काढला. भिजलेला लवंगी फटाका फडणवीस बॉम्ब म्हणून घेऊन आले होते तो फुटलाच नाही असाही टोला राऊत यांनी लगावला.
काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..
लवंगी फटाका होता तर मग दाबून कशाला ठेवला?
मंगळवारी दिलेला अहवाल जर लवंगी फटाका होता तर तो इतके दिवस दाबून का ठेवला होता? एवढे का घाबरले? मी दिलेला अहवाल हा लवंगी फटाका होता की बॉम्ब हे लवकरच समोर येईल. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी बोललं पाहिजे पण त्यांना हे माहित आहे की या मुद्द्यावर बोलणं कठीण आहे. यावर काही बोललं तर चौकशी करावी लागेल. चौकशी करण्याची त्यांना इच्छा नाही सरकारला वाचवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. संजय राऊत इतके मोठे नाहीत की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत, असाही टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT