क्रांती रेडकर ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या आऱोपांबाबत बोलते आहे. नवाब मलिक गुंडागर्दी करून माझ्या नवऱ्याला खुर्चीवरून खाली खेचू पाहात आहेत असाही आरोप क्रांती रेडकरने केला आहे. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले संजय राऊत?
‘एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का? क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही.’
कुणी मराठी, अमराठी असल्याचा प्रश्नच नाही
प्रश्न मराठी अमराठी असण्याचा नाही, सत्य असत्याचा आहे. क्रांतीवर अन्याय होणार नाही. पण केंद्राच्या यंत्रणा राज्यात ज्या प्रकारे मागे लागल्यात व त्यानंतर आता ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळे सगळ्यांना घाम फुटायला लागला आहे. दिल्लीतून तपास यंत्रणांचं आक्रमण सुरू आहे. कारण नसताना मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होतोय. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडवर देगलूरला धाडी पडल्यात. अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथं मराठी तर सगळेच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडेंना खुर्चीवरून हटवण्यासाठी नवाब मलिक यांची गुंडागर्दी सुरू-क्रांती रेडकर
क्रांती रेडकरने काय म्हटलं होतं?
नवाब मलिक यांची गुंडागर्दी सुरू झाली आहे. आपल्याला ते करत असलेल्या आऱोपांवरून हेच दिसतं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते आणखी काहीही आरोप करू शकतात. त्यांचं काम तेच आहे. त्यांनी सांगितलं होतंच की ते समीर वानखेडेंना खुर्चीवरून हटवणार त्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडून नवे आरोप झाले तरी आश्चर्य वाटणार नाही असं म्हणत क्रांती रेडकरने म्हणजेच समीर वानखेडे यांच्या पत्नीने नवाब मलिक यांच्यावर टीका केली
काय म्हणाले होते नवाब मलिक?
‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाणार आहे. तुझा तुरुंगावास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहते आहे. वानखेडेची बोगसगिरी जगासमोर आणणार. समीर वानखेडेचा बाप बोगस होता, हा पण बोगस आहे.. याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला याने तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या तुझ्या बापाचं नाव सांग. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत एकेरीवर येत टीका केली
ADVERTISEMENT