– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन राज्यात बराच वादंग निर्माण झाला आहे. Why I Killed Gandhi? या फिल्ममध्ये अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली. २०१७ साली अमोल कोल्हे शिवसेनेत असताना त्यांनी हे काम स्विकारलं होतं. वाद निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हेंची पाठराखण केली होती. यानंतर शिवसेनेनेही यावर आपली भूमिका मांडली आहे.
वाशिम येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना शिवसेना आमदार आणि गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कोल्हेंची पाठराखण केली आहे.
अमोल कोल्हे हे कलावंत आहेत, तो त्यांचा व्यवसाय आहे. अमोल कोल्हेंनी एखादी भूमिका साकारली याचा अर्थ सर्व काही झालं असा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी अमोल कोल्हेंनी ती भूमिका स्विकारली होती. शरद पवारांनी याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे असं म्हणज देसाई यांनी सावध प्रतिक्रीया दिली.
यावेळी बोलत असताना देसाई यांनी टिपू सुलतानाचं नाव देण्यावरुन सुरु झालेल्या वादावर भाजपला टोला लगावला आहे. “भाजपच्या कोणत्याही नेत्याने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाचा ज्वलंत विचार हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी रुजवला ही बाब पूर्ण देशाला माहिती आहे. तोच विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे. एखाद्या क्रीडा संकुलावरुन शिवसेनेला नाहक अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.” देशातली स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही असंही देसाई म्हणाले.
ADVERTISEMENT