वीर सावरकर यांचा विषय गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. याचं कारण आहे राहुल गांधी यांनी केलेलं त्यांच्याविषयीचं वक्तव्य. हिंगोलीतल्या भारत जोडो यात्रे दरम्यानच्या सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसंच गुरूवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वीर सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र आणि त्यातल्या ओळी वाचून दाखवल्या. आता या सगळ्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसंगी महाविकास आघाडी फुटू शकते असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
राहुल गांधी यांनी हिंगोलीतल्या सभेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला. एवढंच नाही तर वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला. तसंच गुरूवारी त्यांनी एकत्र पत्रही दाखवलं त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी नेमका काय उल्लेख केला होता ते वाचून दाखवलं. त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे.
संजय राऊत यांनी आज काय म्हटलं आहे?
वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केलं आहे.वीर सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
इतिहास काळात काय घडलं त्यापेक्षा..
इतिहास काळात काय घडलं ते चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण केला जावा अशीही अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. देश गुलामगिरीत जातो की काय? अशा अवस्थेत आहे. अशात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांनी वीर सावरकरांचा विषय काढण्याची आवश्यकता नव्हती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर वीर सावरकर यांना भारतरत्न हा पुरस्कार द्यावा ही आमची आग्रही मागणी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT