पुण्यात गुरुवारी आंबिल ओढ्यावर असलेल्या घरांवर कारवाईदरम्यान मोठा वाद झाला. ओढ्यालगत असलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला. या प्रकारानंतर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही सुनावलं आहे. पुण्याची सूत्र जमीन माफीया आणि बिल्डरांच्या हातात गेल्याचा आरोप शिवसेनेने सामना या अग्रलेखातून केला आहे.
ADVERTISEMENT
अनधिकृत आणि बेकायदेशीर घरांचा प्रश्न हा मुंबईत नाही तर पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या शहरांतही वाढला आहे. आंबिल ओढ्यावर असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका कर्मचारी आणि स्थानिक पोलीस पोहचले. यानंतर जनता आक्रमक झाली, हे सर्व बिल्डरांच्या आदेशावरुन सुरु असल्याचा जनतेचा आरोप आहे. आंबिल ओढ्यावरची घरं कायदेशीर की बेकायदेशीर हे नंतर पाहू परंतू भर पावसाळ्यात घरांवर बुलडोझर फिरवून लोकांना रस्त्यावर आणणे हे अमानुष आणि निर्घृण असल्याचं शिवसेनेने अग्रलेखात म्हटलंय.
या कारवाईबद्दल महापालिकेने स्थानिकांना कळवलं नाही, शत्रुच्या घरात रणगाडे घुसवावे तसे बुलडोझर घुसवले गेले. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरीही तिच्या मयताला छाती पिटत जातात, परंतू आंबिल ओढा गरिबांच्या अश्रूने वाहत असतानाही सर्वजण थंड आहेत. बिल्डरांच्या सोयीसाठीच ही निर्घृण कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.
९ जुलैपर्यंत कोणतेही अतिक्रमण हटवू नये असा हायकोर्टाचा आदेश होता. तरीही महापालिकेने लोकांना बेघर केलं. उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत ही घरे जमिनदोस्त करावी अशी कोणती घाई महापालिकेला होती असा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.
ADVERTISEMENT