महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नवीन वादाच्या अंकाला सुरुवात झाली आहे. उत्तराखंडमधील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी राज्य सरकारने कोश्यारी यांना विमान नाकारल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली. यानंतर विरोधी पक्षांत असलेल्या भाजपने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडायला सुरुवात केली. विरोधकांच्या आरोपांवर सामना या वृत्तपत्रात अग्रलेखातून शिवसेनेने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यपालच काय मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येत नाही. मुख्यमंत्री कार्यालय हे नियमाप्रमाणेच वागले. यात राज्यपालांशी वाद घालण्याचा प्रश्न येतोच कुठे? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेत, पण ते ज्या पदावर आज आहेत त्याचा मान व प्रतिष्ठा राखणं ही जबाबदारी त्यांचीही आहे. राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जात असून यातूनच राज्यपालांचे अधःपतन सुरु असल्याचा घणाघात शिवसेनेन आज सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
यावेळी शिवसेनेने राज्यपालांवरही टीकेचे बाण सोडत, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी काम करत असताना कोश्यारी हे इतके चर्चेत आले नव्हते, पण महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यानंतर हा माणूस या न त्या कारणाने चर्चा किंवा वादात राहिलेला आहे. राज्यपालांनी शहाण्यासारखं वागावं असे संकेत असतानाही हे महोदय स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून का पडत असावेत असा सवाल शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे.
याप्रकरणावरुन सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱ्या भाजपलाही सामनाच्या अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आलेत. राजभवन व सरकार यांच्यात हा वाद सुरु असताना भाजपने मध्येच बीच मे मेरा चांदभाई थाटात बांग दिली. राज्यपालांच्या कार्यालयाने एक दिवस आधी विमान उड्डाणाची परवानगी मागितली. सरकारने ती परवानगी नाकारल्यानंतरही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवावे? असा हटवादीपणा करण्याचं कारण काय. राज्यपालांचा हा दौरा खासगी होता, त्यामुळे नियमाने सरकारी विमानाचा वापर इथे करता येणार नाही अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT